क्षणभर उघड नयन देवा — तुझा नि माझा एक पणा — निघाले आज तिकडच्या घरी — झुलवू नको हिंदोळा — अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या जेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच.
माणिक वर्मा यांचा जन्म १६ मे १९२६ रोजी पुणे येथे झाला. सेवासदन शाळेत त्यांचे शिक्षण झाले. लहानपणी त्यांनी गाणं भरपूर ऐकलं. शास्त्रीय संगीत, भावगीतं, भजनं नेहमीच कानांवर पडत. त्यांच्या आईनंच त्यांचं गाणं जागवलं आणि मग त्यांच्या अवघ्या आयुष्याचंच सुंदर गाणं झालं.
सुरुवातीच्या काळात गाणं सादर करताना इतरांचं अनुकरण केलं जाई. पण माणिक वर्मा यांच्या आई हिराबाई दादरकर ”यांनी त्यांचं गाणं ख-या अर्थाने विकसित केलं आणि नंतर त्या किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी संगीत शिकल्या. त्यातून मग गणेशोत्सवातून सुगम संगीताचे कार्यक्रम होऊ लागले.
ग. दि. मांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांचे संगीत लाभलेल्या ‘गीत रामायण’चे साप्ताहिक प्रक्षेपण पुणे आकाशवाणीवर सुरू झाले, तेव्हा त्यात माणिक वर्मांनी अनेक गीते गायली. ती लोकप्रियही झाली. मराठी भाषेतील अनेक गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. चेहऱ्यावर मंद स्मित असे आकर्षक व घरंदाज व्यक्तिमत्व लाभलेल्या माणिक वर्मांनी अनेक कठीण चालींची गाणी इतक्या सहजतेने गायली की घराघरातील बायका ती गाऊ लागल्या. ‘घननीळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा’, हे ‘ळ’चा प्रास असलेले तशाच नागमोडी वळणाचे गाणे गदिमांनी रचले व फडकेंनी स्वरबद्ध केले.
माणिक वर्मा यांची चार रत्न म्हणजे राणी वर्मा, भारती आचरेकर वंदना गुप्ते आणि अरुणा जयप्रकाश…राणी वर्मा यांनी आईचा म्हणजे माणिक वर्मा यांच्या संगीताचा वारसा पुढे चालवला तर वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर अभिनयाच्या क्षेत्रात चमक दाखवताना दिसल्या. गायिका सुनीता खाडिलकर या माणिकबाईंच्या कनिष्ठ भगिनी.
दर वर्षी रंगशारदा महोत्सव योजने अंतर्गत १९९८ सालापासून मे महिन्यात तीन दिवसांचा माणिक वर्मा संगीत महोत्सव साजरा होतो. माणिक वर्मा यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. माणिक वर्मा यांचे ‘किती रंगला खेळ’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या स्वरांइतकेच आनंद देते.
माणिक वर्मा यांचे १० नोव्हेंबर १९९६ रोजी निधन झाले.
Leave a Reply