ठाणे शहराला टेबल टेनिस मधील आंतरराष्ट्रीय पदकांच्या नकाशावर नेणारी ठाणेकर क्रीडापटू म्हणजे मधुरिका सुहास पाटकर ही होय.
वयाच्या ७ व्या वर्षापासून तिने खेळास सुरुवात केली. सन १९९७ पासून ती महाराष्ट्र राज्यातर्फे खेळत आहे. तर सन २००१ पासून ती भारत देशाचे प्रतिनिधीत्व करत आहे. १०० हून जास्त जिल्हा आणि राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये तीने सुवर्णपदके मिळवली आहेत.
वयाच्या सातव्या वर्षी टेबल टेनिसच्या प्रशिक्षणासाठी तिला शैलजा गोहाड ह्यांच्याकडे पाठविले. गोहाड मॅडम यांनी तिच्यातले गुण हेरुन तिच्यावर मेहनत घेण्यास सुरुवात केली आणि मधुरिकाने त्याला उत्तम प्रतिसाद दिला. टेबलटेनिससाठी सर्वस्व अर्पण करण्याची व जिद्दीने मेहनत करण्याची तयारी तिने दाखविली. रेस्ट इज हिस्टरी असे म्हणतात, त्याप्रमाणे आजपर्यंत विविध गटांत १०० हून जास्त विजेतेपदक तिने पटकावली आहेत.
सन २००४ मध्ये ढाका येथे झालेल्या दक्षिण आशियाई कुमारी विजेती स्पर्धेमध्ये मधुरिका एकमेव भारतीय खेळाडू आहे, जिने सांघिक, वैयक्तिक, मिश्र आणि दुहेरी स्पर्धा अशी मिळून ४ सुवर्णपदके मिळवली. सन २००६ ची यूथ चॅम्पियनशिप तिनेच पटकावून राष्ट्रीय युवा विजेती ठरली.
फेब्रुवारी २०१० मध्ये झालेल्या सार्क देशांच्या स्पर्धेत वैयक्तिक, दुहेरी, मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीत मधुरिकाने सुवर्ण पदकांची कमाई केली. सन २०१० मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धामध्ये तिने भारताला टेबलटेनिस मध्ये रौप्य पदक मिळवून दिले. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
Leave a Reply