एखाद्या मोठ्या साम्राज्याची स्नुषा होणं आणि त्या स्थानाचा अधिकार पेलणं ही गोष्ट सोपी नाही. त्यात महाराणी ताराबाई या साक्षात शिवछत्रपतींच्या स्नुषा. तेव्हा ही जबाबदारी पेलणं म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं.
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ताराबाई ही कन्या. मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार राजस्त्री ! शिवाजीराजे आणि संभाजीराजांच्या मागे कणखरपणे तिने राज्याची धुरा सांभाळली. संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक मानाचं पान.
राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी ताराराणीने आक्रमक भूमिका घेतली. मराठे शाहीतील मुसद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून तिने शत्रू थोपवून धरला. लष्कराचा आत्मविश्वास वाढवला.
मोगलांना कर्दनकाळ वाटावेत असे कर्तृत्ववान सरदार त्यांच्या समोर उभे केले. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी तिने मोगली मुलुखावर स्वार्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ निर्माण केले.
करवीर राज्याची, कोल्हापूरच्या राजगादीची तिने स्थापना केली. महाराणी ताराबाईंच्या रूपाने त्याकाळी महाराष्ट्राला असे करारी नेतृत्व मिळाले याचा इतिहासालाही नक्कीच अभिमान आहे.
Leave a Reply