मंगेश तेंडुलकर यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९३६ रोजी पुणे येथे झाला.
उंचापुरा बांधा, पांढरी शुभ्र दाढी, जणू पायाला भिंगरी लागली असावी अशा तऱ्हेने मोटारसायकलवर फिरणारे असं रूप असलेले तेंडुलकर पुण्यात अनेक सार्वजनिक कामात हटकून दिसायचे. टोकदार रेषांचे धनी आणि परखड भाष्य करणारे मंगेश तेंडुलकर हे राजकीय व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्रांसोबतच ते लेखणही करत होते. अनेक नियतकालिकात त्यांचे लेखही प्रसिद्ध झाले आहेत.
शालेय शिक्षण भावे हायस्कूलमध्ये व स. प. महाविद्यालयातून बी.एस्सी. पदवी संपादन केल्यानंतर मंगेश तेंडुलकर यांनी सुरुवातीला काही काळ पुण्यातील ॲपम्युनिशन फॅक्टरीत काम केले. मात्र, व्यंगचित्र रेखाटनाचा छंद जोपासण्यासाठीही त्यांनी आपला वेळ दिला.
मंगेश तेंडुलकरांनी स्वतःची शैली निर्माण केली होती. काही ठिकाणी त्यांनी रंग-रेषातून परखड भाष्य केलेले होते. त्यांचे स्ट्रोक्स हे अतिशय दमदार होते.त्यांच्या प्रत्येक स्ट्रोक्सने अनेकांना घायाळही केले होते. वयाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी कॅरिकेचर्सही शिकले.
त्यांचे ‘संडे मुड’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. पुण्यातील सामाजिक-सांस्कृतिक अशा अनेक सार्वजनिक कार्यक्रमात तेंडुलकरांची उपस्थिती कायम राहात होती. पुण्यातील ट्रॅफिक समस्येवर रस्त्यावर उतरून त्याबद्दल जागृती करण्याचे काम तेंडुलकर गेली १७ वर्षे करत होते.
मंगेश तेंडुलकर हे अखेरपर्यंत कार्यरत असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. मंगेश तेंडुलकर यांनी ९० हून अधिक व्यंगचित्र प्रदर्शन आयोजीत केली होती. स्वतःचा मृत्यू या विषयावरही त्यांनी व्यंगचित्रांची मालिका बनवली होती.
मंगेश तेंडुलकर यांचे १० जुलै २०१७ रोजी निधन झाले.
Leave a Reply