कुलकर्णी, मनोहर

Kulkarni, Manohar

वेगवेगळे कार्यक्रम, भव्य स्टेज शो आदींच्या व्यवस्थापनासाठी हल्ली ‘इव्हेंट मॅनेजर’ कार्यरत असतो. पुण्याच्या ‘मनोरंजन’ संस्थेचे मनोहर कुलकर्णी हे याच प्रकारचे कार्य गेल्या पाच दशकांहून अधिक काळ करीत आहेत. आजच्या काळाचा निकष लावल्यास कुलकर्णी हे मोठे ‘इव्हेंट मॅनेजर’ ठरतात. त्यांच्या या कार्याची, त्यांनी निरलसपणे व तत्परपणे केलेल्या सेवेची दखल नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने घेतली असून, त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला आहे.

नाट्यगृह आरक्षण, स्टेज किंवा डेकोरेशनचे साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परवाने, तिकिटविक्रीची व्यवस्था, साऊंड सिस्टीम, कलावंतांची भोजन आणि निवास व्यवस्था अशा सर्व आघाड्यांवर मनोहर कुलकर्णी हे नाव पुढे आले, की आयोजन करणार्‍यांचा जीव भांड्यात पडतो. काम करत असताना त्यांची कार्यक्षमता व कामाची उरक, अनेक कामे एकाच वेळी समर्थपणा करण्याची क्षमता, त्यांच्या सहकार्‍यांशी व या कामात त्यांची साथसोबत करणार्‍या जवळ जवळ प्रत्येकाशी त्यांनी राखलेला संवादातला व कृतींमधला सुसंगतपणा, व त्यांचा मृदू स्वभाव अगदी वाखाणण्यासारखा असतो.

१९५०च्या सुमारास नटसंघ सरस्वती मंदिर या हौशी नाट्यसंस्थेत सेक्रेटरी म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यानंतरच्या काही कालावधीत स्टेजवर कामही केले; पण त्यांची खरी ओळख निर्माण झाली ती व्यवस्थापक म्हणूनच. चित्तरंजन कोल्हटकर, भालचंद पेंढारकर, चारुदत्त सरपोतदार यांच्या सहकार्याने त्यांनी पुण्यात खुल्या नाट्यगृहाची मुहूर्तमेढ रोवली. नू म वि मराठी शाळा, भावे हायस्कूल यासारख्या शाळांतून खुले नाट्यगृह त्यांनी चालविले. त्यानंतरच्या काळात व्यवस्थापनाची जबाबदारी वाढल्याने त्यांनी ‘मनोरंजन’ ही संस्था सुरू केली. हौशी आणि इतर नाट्यसंस्थांसाठी स्टेज, डेकोरेशनचे साहित्य पुरविण्यापासून ते सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रमांच्या व्यवस्थापनापर्यंत, आयोजकांचा भार हलका करण्याचा प्रयत्न मनोरंजनच्या माध्यमातून त्यांनी केला. कालानुरूप वृत्तपत्रांमधील जाहिराती, बाहेरगावच्या दौर्‍यांचे आयोजन, मराठी चित्रपट प्रसिद्धी आणि वितरण व्यवस्था अशा इतर पूरक बाबीही त्यांनी खुबीने सांभाळल्या. प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या मनोहर कुलकर्णींना नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वजण अण्णा म्हणूनच ओळखू लागले.

अण्णांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यनिमिर्ती क्षेत्रात पाऊल टाकून तिथेही ठसा उमटवण्याची, एवढेच नाही तर सर्वोत्कृष्ठ नाट्यनिमिर्तीचा पुरस्कार मिळवण्यापर्यंतची मजल ‘मनोरंजन’ने मारली. व्यवसायातल्या नफ्या-तोट्याचे गणित जमविण्याऐवजी अण्णांनी नेहमीच आयोजक आणि कलावंतांच्या खुशालीला अधिक महत्त्व दिले. त्यांच्या याच गुणांमुळे नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्षपद भूषवण्याची संधीही त्यांना मिळाली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी, राज्य सरकारच्या वतीने अण्णांना विशेष पुरस्कार देऊन त्यांच्या ५० वर्षांतील निरंतर कामगिरीचा गौरव केला होता. अण्णांच्या नाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या व्यवस्थापनाचा गाढा अनुभव हा सध्याच्या काळातल्या ‘इव्हेंट मॅनेजर्स’साठी ‘केस स्टडी’ ठरला, तर आश्चर्य वाटायला नको!

संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*