बलवंत संगीत मंडळीतील प्रमुख स्त्रीपार्टी नट मास्टर अविनाश यांचा जन्म १ जानेवारी १९०९ रोजी मिरज येथे झाला. मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे शालेय शिक्षण मिरज येथेच इयत्ता पहिलीपर्यंत झाले. वडील लक्ष्मणरावांना संगीताची आवड होती. संगीताचे भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांकडे ते थोडीफार गायकी शिकले होते.
गणपतरावांना २ भाऊ आणि ५ बहिणी. मोठा बळवंत हा बळवंतराव मराठे यांच्या ‘हिंदी नाटक मंडळीत’ बालनट होता. मधला शंकर हा जनुभाऊ निमकरांच्या ‘स्वदेश हितचिंतक मंडळीत होता. पुढे लक्ष्मणरावांनी शंकर आणि गणूला संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’मध्ये दाखल केले. ललितकलादर्शच्या ‘शापसंभ्रम’ मध्ये गणूने महाश्वेताच्या मैत्रिणीचे काम केले.
शंकर आणि गणू या बालनटांची कीर्ती ऐकून कृष्णराव कोल्हापुरे यांनी त्यांना ‘बलवंत’मध्ये आणले. ज्या बलवंत संगीत मंडळीने गणूचे आयुष्यच बदलून टाकले, उजळून टाकले त्या कंपनीत गणू वयाच्या दहाव्या वर्षीच दाखल झाला.
नाटय़ाचार्य अण्णासाहेब (बळवंत) किर्लोस्कर आणि लोकमान्य टिळक यांच्या नावाचा सार्थ अभिमान बाळगणारी बलवंत कंपनी राष्ट्रकार्यातही अग्रेसर होती. कंपनीच्या स्थापनेनंतर लगेचच लोकमान्य टिळकांच्या होमरूल चळवळीच्या फंडासाठी आयोजित केलेल्या ‘पुण्यप्रभाव’ या नाटकाच्या प्रयोगाला स्वत: लोकमान्य टिळक हजर होते. या नाटकात युवराजाची भूमिका करताना गणूच्या ‘भुलूनिया खलजनालापा’ ‘दुर्दैवे हेतू झाला’ ‘अंतरि खेद भरे’ या पदांना आणि भूमिकेला श्रोत्यांची भरपूर दाद मिळाली.
शारदा, उग्रमंगल, भावबंधन, राजसंन्यास, संन्यस्त खड्ग, ब्रह्मकुमारी इ. नाटकातील त्यांच्या भूमिका रसिकांना पसंत पडल्या. दीनानाथांच्या सहवासात आणि त्यांच्याकडून मिळालेल्या संगीत शिक्षणाने गणपतरावांची कला बहरली. बलवंत कंपनीच्या मालकांनी कपंनी बंद करून ‘बलवंत पिक्चर्स’ ही चित्रपटनिर्मिती संस्था काढली.
मास्टर अविनाश यांचे मंगेशकर कुटूंबियांशी त्यांचे घनिष्ठ सबंध होते. दिनानाथ मंगेशकरांच्या पडत्या काळात त्यांनीच हात दिला. दीनानाथांनंतर ह्रदयनाथ, लतादीदींना त्यांनी आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं. दीनानाथांचेही गणपतराव हे प्रिय शिष्य सहकारी होते.
शासनदरबारी त्यांची उपेक्षा झाली हे शल्य त्यांच्या मित्रपरिवाराला आणि चाहत्यांना अस्वस्थ करणारे आहे. मास्टर अविनाश हे संगीत आणि नाटय़क्षेत्राचा चालताबोलता इतिहास आणि शतकाचा साक्षीदार होते. मास्टर अविनाश यांचे निधन ३ एप्रिल २००९ रोजी झाले.
Leave a Reply