मास्टर भगवान यांचे पूर्ण नाव भगवान पालव. मास्टर भगवान यांचा जन्म १ ऑगस्ट १९१३ रोजी झाला.
गव्हाळ वर्ण,अपुरी उंची,चौकोनी रापलेला चेहरा,बटबटीत डोळे,लालपिवळे दात या दादांच्या रुपावर कोणती नायिका भाळणार आणि ते कधी काळी चित्रपटाचे नायक होतील यावर कुणाचा विश्वास बसला नसता, पण दादांच्या मेहनतीने ते घडवलं.
१९३० मध्ये दादांना कॉमेडियन म्हणून ‘बेवफा आशिक’ हा पहिला चित्रपट मिळाला. पण या चित्रपटानंतर दादांना एक वर्ष काहीच काम मिळालं नाही. मात्र ‘बेवफा आशिक’ या चित्रपटातील भूमिका गाजल्यामुळे भगवानदादांना लोक ओळखायला लागले. एक वर्षानंतर जी.पी. पवार यांनी आपल्या ‘जनता जिगर’ या चित्रपटात भगवानदादांना मेन कॉमेडीयनचा रोल दिला.
१९५१ ला रिलीज झालेल्या ‘अलबेला’तील एकाहून एक “सुपरडुपर हिट’ गाणी आणि त्यावरील खास “भगवान-डान्स’ने चारी बाजूला धमाल उडवून दिली. भगवानदादांना अचानक तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील ‘भोली सुरत दिल के खोटे’ हे गाणं जबरदस्त हिट झाले. दादांचा एकाच जागेवर उभे राहून, धीम्या लयीवर, शरीराला विशेष कष्ट न पडू देता केलेला मोहक पदन्यास, रेखीव हावभाव व गीतातील मार्मिक शब्दार्थाला अनुसरून केलेली भावमुद्रेमुळे या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.
दादा कोंडके यांच्यासोबत त्यांची छान जोडी जमली होती. डान्स हाच भगवानदादा यांचा “प्लस पाइंट’ होता. नाचता नाचता हळूवारपणे अलगद खांदे उडवण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी भगवानदादा यांची हीच नृत्यशैली सही सही उचलली. “चोरी चोरी’, “झनक झनक पायल बाजे’ या सिनेमांतील भगवानदादा यांच्या भूमिका गाजल्या.
भगवान दादांच्या जीवनावर आधारीत ‘एक अलबेला’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. भगवानदादा यांचे ०४ फेब्रुवारी २००२ रोजी निधन झाले.
Leave a Reply