मे.पुं रेगे म्हणून प्रसिद्ध असलेले पश्चिमी तत्त्वज्ञानाचे व्यासंगी मेघश्याम पुंडलिक रेगे यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. मे.पुं रेगे हे व्यवसायाने ‘तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांची महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्टय़े होती.
भारतीय आणि पाश्चात्त्य या दोन्ही तत्त्वज्ञानांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. या दोन्ही विचारपरंपरांची अतिशय साधार, स्पष्ट आणि विश्लेषणात्मक मांडणी करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. रेगे यांच्याविषयी महाराष्ट्रातील लेखन-वाचन व्यवसायाशी निगडित असलेल्या अनेकांना नितांत आदर आणि कुतूहल असते.
मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पश्चिमी तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला. पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास हा त्यांचा पश्चिमी तत्त्वज्ञानाचा ग्रंथ ज्यांनी वाचला असेल त्यांना याची खात्री पटेल. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांनी काही काळ ‘नवभारत’ आणि ‘क्वेस्ट’ या मासिकांचेही संपादन केले. ‘नवभारत’मध्ये त्यांनी संपादकीय, लेख, पुस्तक परीक्षणे अशा विविध स्वरूपांचे लेखन केले.
‘इहवाद आणि सर्वधर्मसमभाव’, ‘विवेक आणि न्याय : आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनपर्व’, ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’, ‘स्वातंत्र्य आणि न्याय’, ‘िहदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’ ही त्यांची स्वतंत्र पुस्तके आहेत, तर ‘पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास’ या पुस्तकात नावानुसार पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास आहे.
मे.पुं. रेगे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होते. मे.पुं रेगे यांचे २८ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.
Leave a Reply