रचनात्मक कार्य कारणार्या संस्था उभारुन भरीव सामाजिक कार्य करणारे मोहन सदाशिव हळबे हे ठाण्यातील एक तरुण व्यक्तिमत्व ! मोहन हळबे हे “श्री गजानन मंडळ ट्रस्ट” चे सुमारे ३० वर्षांपासूनचे संस्थापक व विश्वस्त आहेत. ठाण्यातील नौपाडा भागात राहणारे, बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतलेले, “ठाणे पीपल्स” आणि आता रुपी को-ऑप बॅंकेत काम करणारे मोहन हळबे ह्यांनी आपल्या वडिलांची आंतरिक इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून जिद्दीनं आतापर्यंतचं त्यांचं सर्व कार्य उभारलं आहे.
वयाच्या २२ व्या वर्षी आपल्या सहकार्यांच्या मदतीने त्यांनी “श्री गजानन मंडळ ट्रस्ट” ची ठाण्यात स्थापना केली. त्यानंतर ठाण्यातील शिवाई नगर या भागात दोन भूखंड खरेदी करुन तेथे मंडळाच्या कार्यकरीता मंडळाच्या दोन अद्ययावत वास्तू उभ्या केल्या. जेथे “गजानन महाराज मेडिकल सेंटर” व कै. आनंदराव कृष्णराव चोणकर अभ्यासिका” या संस्थांचे काम चालते.
मोहन हळबे ह्यांनी आपल्या कार्याचे धोरण धार्मिक, शैक्षणिक व वैद्यकीय सेवा असे ठेवले आहे. त्यामुळेच या संस्थांमार्फत ठाण्यात त्यांनी आपल्या रचनात्मक कार्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. या सर्व कार्यासाठी त्यांना आतापर्यंत “यशवंत पुरस्कार” (२००५) तसेच ठाणे महागरपालिकेचा “ठाणे गुणीजन” (२०१०) हा पुरस्कार मिळाला आहे.
त्यांनी उभारलेल्या अभ्यासिकेत जवळपास १५० विद्यार्थ्यांना पुस्तकांसहित सर्व सुविधा प्राप्त होतात. तसेच ठाणे शहरातील व शहरालगतच्या लोकांसाठी उभारलेल्या श्री गजानन महाराज मेडीकल सेंटरच्या माध्यमातून सर्वांना केवळ ५० टक्के खर्चात आरोगय सेवा पुरविली जाते.
त्यांनी चालू केलेले धार्मिक, शैक्षणिक व वैद्यकीय सेवेचे कार्य शहराच्या कानाकोपर्यात पोहचविण्याची त्यांची इच्छा आहे. तसेच भविष्यात ठाणे शहरालगत एखादा “वृद्धाश्रम” बांधण्याचं त्यांच्या मनात आहे.
अशाप्रकारे आदर्श धार्मिक स्थळ उभारून अध्यात्मिक वृत्तीने सामाजिक पण रचनात्मक कार्य कसे करावे, याचा वस्तूपाठच मोहन हळबे यांनी घालून दिला आहे.
Leave a Reply