मोहन वाघ

छायाचित्रकार, नाट्यनिर्माते, नाट्यदिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार मोहन वाघ यांचा जन्म ७ डिसेंबर १९२९ रोजी झाला.

मोहन वाघ मूळचे कारवारचे. जे. जे. कला महाविद्यालयातील शिक्षण अर्धवट सोडलेल्या वाघांनी नंतर छायाचित्रण सुरू केले. छायाचित्रणापासून करिअरची सुरूवात करणारे मोहन वाघ नंतर नेपथ्य, नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते म्हणून नावारूपास आले. कमाल अमरोहींच्या पाकिजासाठी त्यांना डिझाईनचा राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला.

चंद्रलेखा हे खरे तर नाटककार वसंत कानेटकरांच्या मुलीचे नाव. त्यांनीच हे नाव वाघांना सुचवले आणि ही नाट्यसंस्था जन्माला आली. या संस्थेतर्फे त्यांनी अनेक दर्जेदार नाटके रंगभूमीवर आणली. चंद्रलेखाची नाटके म्हणजे नेपथ्यापासून, कथा, सादरीकरण, कलावंत आणि अभिनय यांचा दर्जा असा अलिखित नियम होऊन बसला. ऑल दी बेस्ट ही एकांकिका पाहिल्यानंतर तिचे नाटकात रूपांतर करण्याचे व्यावसायिक धाडस त्यांनीच दाखवले आणि हे नाटक यशस्वीही करून दाखवले.

मोहन वाघांनी तब्बल ८३ नाटकांची निर्मिती केली. त्यांचे १५,६४७ एवढे प्रयोग केले, पण त्यांची फक्त १५ नाटकंच व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी ठरली. तरीही प्रत्येक कलाकाराला प्रयोगानंतर पाकीट द्यायलाच हवं, आजचं पाकीट उद्या द्यायचं नाही, हा त्यांचा नियम होता.

प्रेमगंध, बहुरूपी आणि एक तिकीट सिनेमाचं ही नाटके तर उत्कृष्ट नेपथ्यामुळेही गाजली. नेपथ्यामुळे नाटक गाजविण्याचाही विक्रम मोहन वाघ यांनी प्रस्थापित केला. मोहन वाघांनी नवख्या कलाकारांना घेऊन केलेल्या ऑल दी बेस्ट नाटकाचे तीन हजारांवर प्रयोग झाले आहेत. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर या सध्या मराठी सिनेसृष्टीत गाजणार्याफ नटांना मोहन वाघांनीच ऑल दी बेस्टमधून ब्रेक दिला.

पु.ल. देशपांडे, व्हि. शांताराम, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर या आणि अनेक विभुतींचे फोटो त्यांच्या कॅमेर्यााने टिपले. ते फोटो ‘वाघांचे फोटो’ म्हणून ओळखले जावेत असा त्यांचा ठसा त्यावर उमटलेला आहे. त्यांच्या या फोटोग्राफीबद्दल खुद्द लतादिदींनी त्यांना ‘हे तर फोटोग्राफीतले लता मंगेशकर आहेत, अशी कौतुकफुले उधळली होती. मोहन वाघ यांच्यामुळेच मधुबाला, नर्गिस, वैजयंतीमाला या गाजलेल्या अभिनेत्रींची विलोभनीय छायाचित्रे लोकांसमोर येऊ शकली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांचे जावई.

मोहन वाघ यांचे निधन २४ मार्च २०१० रोजी झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*