जेष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३० गोव्यातील माशेल येथे झाला. मोहनदास सुखटणकर यांचे पणजोबा, आजोबा आणि वडील हे त्या काळातील प्रख्यात वैद्य. मोहनदास यांचे प्राथमिक आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण माशेल आणि म्हापसा येथे झाले.
म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले.
त्या नाटुकलीचे नाव होते, ‘खोडकर बंडू’.
नाटुकलीत खोडकर बंडूची प्रमुख भूमिका करून ज्या वेळी त्यांनी बक्षीस पटकावले, त्या वेळी प्रेक्षकांनी त्यांच्या धिटाईचे कौतुक केले. या नाटुकलीमुळेच सुखटणकरांना नाटकाची गोडी लागली. त्या निमित्ताने आपल्याला मुळातच अभिनयाची आवड होती याची जाणीवही त्यांना झाली.पुढे गोव्यात ‘अँग्लो-पोर्तुगीज इन्स्टिटय़ूट’ या हायस्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या वार्षिक संमेलनातून तीन ते चार वर्ष स्व-लिखित कोकणी प्रहसनांतून मोहनदासांनी विनोदी भूमिका साकारल्या व पारितोषिकेही मिळवली.
तेव्हा अभिनयात करिअर करायचे आहे, असे काही त्यांच्या मनात नव्हते. पण छंद म्हणूनच सुखटणकर सारे करीत होते. त्यांच्या गांधीवादी विचारांच्या मामांचे एक सांगणे असायचे, आयुष्यात छंद जोपासावेत, पण मुख्य कामाकडे दुर्लक्ष करून नाही. मामांचे विचार त्यांच्यावर बिंबले ते कायमचे. त्यामुळे अभिनयाचा छंद जोपासताना सुखटणकरांनी शाळेच्या अभ्यासाची कधीही हेळसांड केली नाही.
गाडीत ‘इकॉनॉमिक टाइम्स’चे सहसंपादक डी. के. रांगणेकर होते. रांगणेकर कुटुंब मूळचे गोव्याचे असल्याने ते सुखटणकर कुटुंबीयांना ओळखत होते. विचारपूस झाल्यानंतर रांगणेकर यांनी त्यांना गाडीत बसायला सांगितले व त्यांना चष्म्याच्या काचा व फ्रेम बनविणाऱ्या ‘माँटेक्स कॉर्पोरेशन’ कंपनीच्या मालकांकडे घेऊन गेले. ‘याला नोकरी द्या’ अशी विनंती मालकाला केली.
‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या स्पध्रेत चारुशीला गुप्ते यांच्या ‘आम्ही सारेच वेडे’चा प्रयोग झाला. त्यात सुखटणकरांनी एका प्रौढाची विनोदी भूमिका वठवून उत्कृष्ट अभिनयासाठी असलेले पारितोषिक मिळवले. भारतीय विद्याभवनात ‘आंतर महाविद्यालयीन नाट्यस्पर्धा’ व्हायच्या. तिथे सुखटणकरांनी ‘भाऊबंदकी’त काम केले आणि. गंगाधर गाडगीळांच्या ‘वेडयांचा चौकोना’तही केले.. या दोन्ही नाटकांसाठी त्यांना बक्षीस मिळाले.
मोहनदास सुखटणकर यांच्या आयुष्यात आणि नाटय़ प्रवासात ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ला खूपच महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत अगोदर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर ‘कार्यकर्ता’ भूमिकेत वावरले. संस्थेच्या बहुतेक नाटकांमधून मोहनदास सुखटणकर यांनी कामं केलीत. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात स्त्रीपात्र सोडून त्यांनी बहुतेक भूमिका साकारल्या. मोहनदास सुखटणकर यांनी चाळीस नाटकांमधून कामं केली आहेत. मत्स्यगंधा (चंडोल) , लेकुरे उदंड झाली (दासोपंत ), अखेरचा सवाल (हरिभाऊ), दुर्गी (मोरोबा नाडकर्णी), स्पर्श (नाटेकर), आभाळाचे रंग (आबा) ही काही त्यांची गाजलेली नाटकं.
मोहनदास सुखटणकर यांना राजहंस प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘राजहंस पुरस्कार’ , नाट्यक्षेत्राची ५०हून अधिक वर्षे सेवा केल्याबद्दल मुंबईच्या ’आम्ही गोवेंकर’ या प्रतिष्ठित संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहेत.
Leave a Reply