राऊत, नमिता

Raut, Namita

महिला सक्षमीकरणाचा नवा व समर्थ चेहरा म्हणून नमिता राऊत यांच्याकडे पाहिले जाते. महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले .

महिला बचत गट स्थापन करून महिलांसाठीच्या हिताची कामे करण्यास सुरूवात केली. या बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी अनेक निराधार महिलांना मायेची सावली दिली. त्यांचे सामाजिक कार्य, सेवावृत्ती स्वभाव तसेच त्यांचा दांडगा जनसंपर्क पाहून २००२ साली त्यांना प्रथमच ठाणे जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली. त्यावेळी त्यांनी शिक्षण समितीच्या माध्यमातून तत्कालीन शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. शिक्षण क्षेत्राचे कामकाज पाहात असताना शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले. २००७ साली त्यांना दुसर्‍यांदा उमेदवारी मिळाली आणि त्या महिला व बालकल्याणच्या सभापती झाल्या. ज्या जोमाने व उद्दीष्टांनी शिक्षण विभागामध्ये काम केले, किंबहुना त्याच तत्परतेने महिला व बालकल्याण विभागामध्ये काम केले. अंगणवाडी, बालवाडी, महिला बचत गट यातून महिलांचा उध्दार व्हावा या उद्देशाने राऊत यांनी विविध योजना राबवल्या. हळद, मसाले, पापड अश्या उत्पादनांची निर्मिती महिला बचत गटांमार्फत करून या पदार्थांना बाजारपेठ मिळवून देण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत.

ठाणे जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभाग सांभाळत असताना त्यांनी दुरच्या शाळेत असलेल्या मुलींसाठी सायकल उपलब्ध करुन दिल्या. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत दारिद्रय रेषेखालील महिलांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी शिलाई मशिन पुरवल्या. ० ते ६ या वयोगटातील बालकांच्या आरोग्याची तपासणी डॉक्टरांकडून घेण्यासाठी वेळोवेळी रोगनिदान शिबीरे आयोजित केली. तसेच अंगणवाडी व बालवाडीमध्ये उत्कृष्ट काम करणार्‍या सेविकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. विविध क्षेत्रामध्ये बालक व महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना वह्या वाटप, दुर्गम भागांमध्ये शालेय साहित्याचे वाटप असे उपक्रम नित्याने सुरुच असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*