नंदिनी बेडेकर

जयपुर-अतरौली घराण्याच्या गायिका नंदिनी बेडेकर यांचा जन्म १४ नोव्हेंबर रोजी झाला.

नंदिनी बेडेकर या विदुषी किशोरीताई आमोणकर यांच्या ज्येष्ठ शिष्या आहेत. त्यामुळे दुर्गेचेच एक रूप असलेल्या सरस्वतीचा स्पर्श त्यांच्या कलेला लाभला आहे.

नंदिनी बेडेकर या माहेरच्या नंदिनी पणशीकर. नंदिनी यांना लहानपणापासूनच रेडिओवर गाणी ऐकायची आणि त्याचं अनुकरण करत गुणगुणायची आवड होती. ही आवड त्यांचे वडील आणि प्रसिद्ध लेखक दाजी पणशीकर यांनी हेरली आणि वयाच्या १६ व्या वर्षांपासूनच गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्याकडे त्यांना शास्त्रीय संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. गुरुपरंपरेनुसार किशोरी आमोणकर यांच्या घरी राहून नंदिनी यांची गायनाचे धडे गिरवायला सुरुवात झाली.

सकाळी उठल्यानंतर साधारण ११-१२ वाजेपर्यंत रियाझ त्यानंतर पुन्हा संध्याकाळी ५ वाजता अन्य शिष्यमंडळीबरोबर रियाज आणि मग रात्री १२ वाजल्यापासून पहाटे साधारण ३ वाजेपर्यंत किशिरीताईंच्या अभ्यासाचा विषय असलेल्या रससिद्धांताचा अभ्यास; असा काहीसा त्यांचा दिनक्रम असायचा.

गुरु कष्ट घ्यायला तयार असेल आणि शिष्याने सुद्धा कष्ट घेण्याची तयारी दाखवली तरच शास्त्रीय संगीत गायनाला महत्व आहे. गाणं शिकत असताना इतका चांगला गुरु लाभला हे माझं भाग्यच. गुरूचा सूर आणि शिष्याचा सूर जेव्हा एकमेकांशी संवाद साधायला सुरुवात होते तेव्हाच खरं गाणं खुलत जातं असं नंदिनी ताई म्हणतात.

नंदिनी बेडेकर या सध्या ठाण्यात आपल्या संगीतातील ठेवीचा त्यांच्या शिष्यांनाही आपली कला जोपासण्यासाठी मदत व्हावी यासाठी त्यांना संगीताचे धडे देत आहेत. त्याचबरोबर त्यांनी आत्तापर्यंत मुंबई, पुणे, जयपूर, गोवा अशा अनेक ठिकाणी झालेल्या प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये आपली कला सादर केली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*