विदर्भातील ज्येष्ठ चित्रकार नारायण वासुदेव ऊर्फ नाना गोखले यांनी ३ जून रोजी १०१व्या वर्षात पदार्पण केले आहे. आयुष्याचे शतक साजरे करणाऱ्या भाग्यव ंतांपैकी नाना एक आहेत. मूळचे दर्यापूरचे असलेल्या नानांचे वास्तव्य सध्या नागपुरात आहे.
एक उत्तम चित्रकार म्हणून नानांची ओळख आहे. निसर्गचित्र काढणे हा त्यांचा आवडता छंद आहे. सकाळीच जीन्स, टी शर्ट अशा वेशात हातात कोरा कॅनव्हॉस आणि रंग साहित्य घेऊन निसर्गरम्य परिसरात जाताना या ‘तरुणा’ला अनेकांनी पाहिले आहे. त्यांच्या काही निवडक चित्रांचे प्रदर्शन मुंबईत अलीकडेच लावण्यात आले होते. आजही ते बसल्याबसल्या सहजपणे सुंदर स्केच काढतात. शहरात असलेल्या चित्र प्रदर्शनाला ते या वयातही भेट देतात. विशेषत: सिस्फा या छोट्या गॅलरीत तरुणांच्या चित्रांचे प्रदर्शन पाहायला ते आवर्जून जातात. तरुणांची चित्रे पाहिली की आपण इतकी वषेर् जगलो याचा आनंद होतो व आणखी जगण्याचा हुरुप येतो, असे ते म्हणतात. नाना मुळात हाडाचे शिक्षक. दर्यापूरच्या प्रबोधन हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. १९७२मध्ये त्यांना उत्कृष्ट शिक्षकाचा राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांनी लेखनाचाही छंद जोपासला आहे. त्यांनी भगवद्गीतेचे समश्ाोकी हिंदी रूपांतर केले आहे तर बायबलच्या जुन्या कराराचे ओवीरूप रूपांतर केले आहे. गांधीविजय आणि गाडगेमहात्म्य ही काव्यरूप चरित्रे, गीतेत काय आहे?, दासबोधात काय आहे? ही त्यांची विवेचक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. सांध्यसुक्ते हा काव्य संग्रह, थेम्सच्या तीरावरून ही लेखमाला, गीतेचे दोन भाष्यकार शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर ही त्यांची अप्रकाशित ग्रंथसंपदा आहे. आता शंभरीतही त्यांचे लेखन चालू असते. त्यांनी नुकताच गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. त्यांना शास्त्रीय संगीताची उत्तम जाण असून ते एकेकाळी गायन करीत व पेटीही वाजवीत. त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त नागपुरातील सिस्फा गॅलरीत त्यांचा नुकताच हृद्य असा सत्कार करण्या आला. यावेळी वेगवेगळ्या वयोगटातील मुलांनी चित्रे काढून हा वाढदिवस साजरा केला. या वयातही त्यांनी आपले क्रिकेटचे वेड जोपासले आहे, ते क्रिकेटचे सामने टीव्हीवर बघतात. वयोमानाने एका डोळ्याची दृष्टी गेलेली असली तरी ते भारत-पाक क्रिकेट मॅच बघण्याची संधी चुकवीत नाहीत. आयुष्यात सतत काही तरी विधायक करीत राहणाऱ्या नानांची जगण्याची जीगिषाच त्यांना शंभरीपर्यंत घेऊन आली.
Leave a Reply