मराठीला मोजक्या पण खानदानी काव्यसंग्रहांची लेणी चढविणारे नरेंद्र बोडके हे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. व्यवहाराच्या चौकटीत, नोकरीच्या चाकोरीत, साचेबंद दिनक्रमात आणि नात्यांच्या रूढ व्याख्यांमध्ये ते कधी मावले नाहीत.
बोडके हे मुंबई विद्यापीठात पहिले आले होते. न. चिं. केळकर सुवर्णपदक पटकावून एम. ए. झाले होते. वयाच्या चोविसाव्या वर्षी ‘पंखपैल’ हा त्यांच्या प्रतिभेची चमक दाखवणारा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. इंग्रजी साहित्य आणि समीक्षा यांची त्यांना उत्तम जाण होती. समानधमेर् जोडण्याची हातोटी होती. वृत्ती आनंदी, तरी विश्लेषक होती. बोलण्यात अस्सल चमक होती. इतके सारे असूनही त्यांना लौकिक यश फार थोडे मिळाले. मराठी साहित्यावरही क्षमतेइतकी मोहोर उठली नाही.
‘पंखपैल’नंतर ‘सर्पसत्र’, ‘शुकशकुन’, ‘श्यामल’, ‘शोधवर्तन’, ‘हसता खेळता गडी’, ‘अनार्य’ हे काव्यसंग्रह आले. ‘सन्मुख’ हा शेवटचा.
बोडके यांच्यावर गोव्याचे संस्कार होते पण त्यांची कविता ‘बोरकरी’ नव्हती. मळलेल्या अर्थाने ते नवकवीही नव्हते. त्यांच्या कवितेला सर्वस्पर्शी, विराट नियती मान्य होती. कदाचित् लौकिकातही नियतीचा हा पार्श्वमंच मान्य असल्याने ते महाराष्ट्रात कुठेही ‘फेकले गेले’ तरी निर्लेप मनाने कवितेत, तत्त्वचर्चेत जगू शकले.
बोडके यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली. प्राध्यापकी केली. विपुल गद्य लिहिले. भाषांतरे केली. कालिके काढली. नेत्यांचा आश्रय घेतला. प्रकाशन काढले. साहित्य व चर्चामंडळे चालवली. कलह केले. नोकऱ्या सोडल्या. जिवलगांचा अंत पाहिला. कविता मात्र बावनकशी लिहिली.
Leave a Reply