चिखलीकर, नर्गिसबानू

Chikhalikar, Nargisbanu

नर्गिसबानू यांचा जन्म निपाणीजवळच्या चिखली या छोट्या गावामध्ये झाला. कलावंतांचं कुटुंब असल्यामुळे कलेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी चिमुकल्या नर्गिसने कथ्थक शिकायला सुरुवात केली होती. इतरांना थक्क करून टाकणारी तिची ही नृत्य कला बाबासाहेब मिरजकर या तिच्या रत्नपारखी गुरूंनीही त्यावेळी चांगलीच ओळखली होती. त्याकाळी कोल्हापुरात लावणी-लोकनाट्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठल्याने अशा नतिर्कांना नेहमीच मागणी असे. उत्तम बांधा, आकर्षक व्यक्तिमत्त्व व नृत्यकौशल्यात पारंगत असणार्‍या नर्गिस यांच्यात अभिनयगुणांचीसुध्दा बिलकुल कमतरता नव्हती. त्यांनी प्रथम लोकनाट्यातून रंगमंचावर पाऊल ठेवलं.

‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ यांसारख्या अनेक गाजलेल्या लोकनाट्यांतून त्यांनी कामे केली. ‘नर्तकी’ या एका नाटकातही त्यांनी संस्मरणीय भूमिका निभावली होती. व्यक्तिमत्त्वाने अत्यंत आकर्षक असल्याने रंगमंचावरची त्यांची मोहक अदाकारी पाहण्यासाठी थिएटरांमध्ये तोबा गर्दी लोटायची. उत्तमोत्तम लावण्यांसाठी अकलूजचं नाव आज आघाडीवर असलं, तरी एकेकाळी तिथे होणार्‍या कोणत्याही कार्यक्रमाची सांगता नर्गिसबानूंशिवाय झालेली नाही. रंगमंचावरच्या त्यांच्या अदाकारीने त्यांना सिनेमामध्ये ग्रुप डान्सर म्हणून संधी मिळाली. त्यांनीही या संधीचे सोने करून दाखविले.

१९५९ च्या दरम्यान आलेल्या ‘चाळ माझ्या पायांत’ मध्ये त्यांनी ग्रुप डान्सर म्हणून आपल्या स्वप्नवत वाटचालीमधील दुसरा अध्याय सुरू केला. नतिर्कांच्या त्या व्यावसायिक ताफ्यातही नर्गिसबानू यांचं वेगळेपण ठसठशीतपणे समोर आलं. चंदेरी दुनियेलाही त्यांनी अल्पावधीतच भुरळ घातली. त्यानंतर ‘शिकलेली बायको’, ‘कन्यादान’, ‘बाई मी भोळी’, ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’, ‘तोतया आमदार’, ‘डोंगरची मैना’, ‘सुदर्शन’, ‘पाच नाजुक बोटं’, आदी सिनेमांमधून आपलं नृत्यकौशल्य रसिकांना दाखवलं. अनेक सिनेमांमधून त्यांनी छोटी-मोठी कामंही केली. ‘सुदर्शन’ या सिनेमात त्यांनी अभिनेत्री जीवनकला यांच्यासोबत केलेली नृत्याची जुगलबंदी रसिकांच्या आजही स्मरणात आहे. त्यांच्या सिनेक्षेत्रातल्या भरीव योगदानाची दखल घेऊन चित्रपट महामंडळाने त्यांना २००८ मध्ये ‘चित्रकर्मी पुरस्काराने’ सन्मानित केलं.

उभं आयुष्य त्यांनी नृत्यकलेलाच आपलं दैवत मानलं. अवघ्या सातव्या वर्षापासून नृत्यकला शिकण्यास सुरुवात केल्यामुळे कालांतराने त्यांच्या पायांच्या रक्तवाहिन्यांना सूज येऊ लागली. साधारण १४ वर्षांपूर्वीच एका नाचावेळी पायाला घुंगरू लागण्याच निमित्त होऊन त्यांच्या पायाला गँगरिन झाला. त्याला इन्फेक्शन झाल्याने नर्गिसबानू यांनी रंगमंचाचा तडकाफडकी दुःखद निरोप घेवून अनेक दर्दी रसिकांना हळहळण्यास भाग पाडलं. डॉक्टरांनी निदान करताना, गँगरिन झालेला पाय कापण्याचा सल्ला दिला. एका नतिर्केला पाय गमवावा लागणं, हे नर्गिस बानूंच्या पचनी पडणारं नव्हतं. त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिलाच. पण पाय काढण्यापेक्षा होणार्‍या यातना सोसण्याची अजब अशी तयारी दर्शवली. असह्य वेदनेसोबत सुरू असलेली ही झुंज १४ वर्षं निकराने लढवल्यानंतर त्यांच्या वयाच्या ६७ व्या वर्षी हा लढा कायमचा संपला.

संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स

2 Comments on चिखलीकर, नर्गिसबानू

  1. अत्यंत गुणी नर्तिका आणि लावणी साठी लागणारी नृत्य निपुणता या गुणी कलाकाराच्या ठायी होती. अत्यंत नैसर्गिक दैवी देणगी या कलावंतीण ला शेवट इतका दुर्दैवी व्हावा हे खुप मनाला लागलं. मी तसा नैसर्गिक संगीत ऐकणारा आणि लहानपणापासून च हिंदी मराठी संगीता चा भक्त आणि विशेष करून लावणी संगीत नृत्या चा भक्त पण आमच्या अकोला येथे लावणी मंडळ नसल्यामुळे अकोल्याला येणाऱ्या मोजक्या सुरेखा पुणेकर यासारख्या कलावंत यांचेच कार्यक्रम पाहण्याचा योग आला. मी नेट वर नर्गिस बानो यांचं परभणी हुनी आलेत पाहुणे कुणी हे गाणं पाहिलं आणि त्यांच्याबद्दल विशेष आदर निर्माण झाला. अत्यंत सुंदर असं त्यांच पदलालित्य होतं. त्यांना प्रत्यक्ष भेटू शकलो नाही ही खंत कायम राहील. त्यांना माझी श्रद्धांजली ?? दिनेश बोधडे पाटील राहणार वणी रंभापूर हल्ली मुक्काम अकोला

  2. या लेखात आपण हिंदी नटी व सुनील दत्त यांच्या पत्नी यांच चित्र टाकलं आहे. Admin यांनी काढून प्रत्यक्ष या नृत्य निपुण कलावती च चित्र टाकावं ही विनंती ??

Leave a Reply

Your email address will not be published.


*