निलेश चव्हाण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष आहेत. दिनांक १८ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी या पदाची सूत्रे स्विकारली. त्या दिवसापासून २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूका जाहिर होईपर्यंतच्या जवळपास २१ महिन्यांच्या कालावधीत लोकांचे प्रश्न सोडवताना पडतील ते कष्ट सोसले आणि रोज नव-नवीन परिक्षांना त्यांना सामोरे जावे लागले. माणसं जोडण्याची आवड आणि पारदर्शक व प्रामाणिक कामाची सवय या जोरावर त्यांनी लोकांमध्ये व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणले आणि “मनसेच्या ठाणे कार्यालयात गेल्यावर आपले काम होणारच” अशी भावना त्यांनी जनमानसात निर्माण केली.
एका सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले निलेश चव्हाण हे व्यवसायाने स्थापत्य अभियंता (सिव्हील इंजिनिअर) आहेत त्यामुळे नागरी सुविधांच्या बाबतीत असलेला नियोजनाचा (प्लानिंग) अभाव त्यांना प्रकर्षाने जाणवतो. प्रचंड प्रमाणात त्रुटी असलेल्या नागरी सुविधा म्हणजे “एक ना धड भाराभर चिंध्या”, पैसे आहेत पण नियोजन नाही, त्यामुळे केलेला खर्च वाया जातो आणि त्याच त्याच कामांवर पुन्हा पुन्हा खर्च करावा लागतो.
निलेश यांना नेहमी प्रश्न पडतो की ज्या लोकप्रतिनिधींवर ठाणेकर जनतेने गेली अनेक वर्ष सातत्याने विश्वास ठेवला ते लोकप्रतिनिधी लोकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत खरचं गंभीर आहेत का? कारण आजही ठाणे शहरात एकही चांगले शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालय नाही, चांगली व नियमित बससेवा नाही, चांगल्या शाळा नाहीत, पार्किंगच्या भूखंडांवर अतिक्रमण झाल्याने पार्किंगची व्यवस्था नाही, खारफुटीची कत्तल करुन खाडीत व अन्यत्र दररोज नव्याने अनधिकृत बांधकामे होत आहेत, पिण्याच्या पाण्याचे नियोजन नाही, कचऱ्याचे नियोजन नाही, फूटपाथ वरुन चालायला जागा नाही, मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत, टोलच्या वसुलीत पारदर्शकता नाही.
निलेश चव्हाण यांच्या मते या सर्व गोष्टींना राजकीय नेतेच जबाबदार आहेत. सामान्य ठाणेकर नागरिकांच्या आयुष्यातला हा “नाही” चा “होय” करणे शक्य आहे आणि त्यासाठी तळमळीने काम करण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे. त्यासाठीच ते “महाराष्ट्र नवनिर्माण सेने”कडून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीला उभे आहेत.
बदल घडवण्यासाठी धोरणं (पॉलीसी) निश्चित करणे किंवा त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे असते आणि हे काम महाराष्ट्राच्या पवित्र विधीमंडळ सभागृहातूनच होऊ शकते यावर त्यांचा विश्वास आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा (ब्ल्यू प्रिंट) दिनांक २५ सप्टेंबर २०१४ रोजी जनतेसमोर मांडला. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते की “येथे सगळे पक्ष आप-आपला विचार करीत आहेत आपण तरी महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करु.” ठाणे शहरात याचे प्रतिबिंब उमटविण्यासाठी बदल आवश्यक आहे आणि त्यासाठी तळमळीने काम करण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे.
निलेश चव्हाण यांचे वडील श्री हरिश्चंद्र चव्हाण यांना ठाणेकर नागरिक एक अहिंसावादी विचारसरणीचे, निस्वार्थ सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखतात. कोकणातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले श्री हरिश्चंद्र चव्हाण नोकरीनिमित्त १९६२ साली ठाण्यात आले व त्यांनी कामगार क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रातही काम केले. १९७८ साली पुलोदचे सरकार आल्यानंतर काँग्रेस एस या पक्षाचे ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी नेतृत्व केले. जुन्या ठाण्याचे रस्ते अरुंद होते, ते रुंद करण्यासाठी ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी दीड वर्षात प्रत्यक्ष रस्त्यावर उभे राहून ठाण्याचे ३३ रस्ते रुंद केले. विस्तारीत झालेल्या रस्त्यांमुळे ठाण्याचा चेहराच बदलला. मात्र त्यामुळे चिडून जावून ११ डिसेंबर १९८८ यादिवशी ८० विरुध्द ११ अशा पाशवी बहुमताने ठाण्यातील नगरसेवकांकडून टी. चंद्रशेखर यांची हकालपट्टी करण्यात आली. ठाण्याच्या विकासावर आलेले हे संकट चव्हाण यांना पसंत पडले नाही म्हणून त्यांनी ठाणेकर जनतेस आवाहन करुन आंदोलन छेडले अणि ठाणे विकास नागरिक संघर्ष समितीची स्थापना केली. वर्तमानपत्रातील बातमी वाचून हजारो ठाणेकर रस्त्यावर उतरले आणि शासनाचा “हम करे सो कायदा” जनतेने हाणून पाडला. आज ठाण्यात रुंद झालेले जे रस्ते दिसतात ते श्री हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली जमलेल्या ठाणेकरांच्या जागृकतेचे आणि एकीचे बळ म्हटले तर वावगे ठरणार नाही.
निलेश चव्हाण यांचे सामाजिक उपक्रम…
१. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक हजार झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला. त्याचा शुभारंभ करताना आमदार प्रविण दरेकर यांनी केला.
२. मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या परिसंवादात अर्थतज्ञ व कालनिर्णय उद्योगसमुहाचे प्रमुख जयराज साळगावकर, दिग्दर्शक रवि जाधव, परममित्र प्रकाशन संस्थेचे प्रकाशक माधव जोशी व अक्षराय संस्थेचा गौरव करण्यात आला.
३. तरुणांना शासकीय नोकऱ्या मिळाव्यात व त्यासाठी आवश्यक “स्पर्धा परिक्षांना” सामोरे जाण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ठाण्यातील चिंतामणराव प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेला निलेशने संगणक भेट म्हणून दिला.
४. “मोतीबिंदू मुक्त ठाणे शहर” अभियान हाती घेतले. 84 रूग्णांवर डॉ. चंद्रशेखर वावीकर यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.
५. ठाणे रेल्वे स्थानकातील प्रसाधनगृहांची संख्या वाढविण्यात यावी व रेल्वे हद्दीतील फेरीवाल्यांवर कारवाई करावी यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधकांची भेट घेऊन निवेदन दिले.
६. अस्वच्छतेचे व असुविधांचे आगार असलेल्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या वैद्यकीय तज्ञ व इतर कर्मचार्यांच्या ४७ पदांना शासनाने त्वरीत मंजूरी द्यावी यासाठी नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
७. मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे खारफुटीची कत्तल करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.
८. ठाण्यातील एका तरुणीने चालत्या रिक्षातून उडी मारली. या घटनेमुळे ठाणेकर नागरिकांचा प्रवास अत्यंत असुरक्षित आहे हे उघड झाले. म्हणून ठाणे शहरातील नागरिकांना फोन टॅक्सीप्रमाणेच “फोन-अ-रिक्षा सेवा” देण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. या मागणीला प्रादेशिक परिवहन अधिकारी (आर.टी.ओ.) ठाणे यांनी हिरवा कंदील दिला. प्रस्ताव मंजुरीसाठी परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठविला असून यामुळे प्रवाशांना सुरक्षित व चांगली सेवा उपलब्ध होईल.
Leave a Reply