नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ रोजी झाला.
अनंत दामले यांनी १९३० ते १९९० अशी जवळ-जवळ सहा दशके मराठी संगीत रंगभूमी आपल्या गायकीने व अभिनयाने ९२ नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका करीत समर्थपणे गाजविली. आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीच्या काळात अनंत दामले यांनी अनेक भूमिका वठविल्या, परंतु त्यांचा मुख्य लौकिक झाला तो नारदाच्या भूमिकेमुळे.
‘नारद म्हणजे दामलेबुवा आणि दामलेबुवा म्हणजे नारद’ असं समीकरणच होऊन बसलं. रंगभूमीवर ३००० पेक्षा ज्यास्तवेळा नारदाची भूमिका साकारण्याचा उच्चांक अनंत दामले यांनी केलेला होता. १९३९ साली न.चि.केळकर अनंत दामले यांचे ‘कृष्णार्जुन युद्ध’ या नाटकाचा प्रयोग पहायला आले होते.
१९४० ला ऑपेरा हाऊसला ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकाचा प्रयोग एका संस्थेच्या मदतीसाठी धर्मार्थ प्रयोग म्हणून लावला होता.अध्यक्ष म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर आले होते. या प्रयोगाच्या वेळी अ.ह.गद्रे यानी स्वा.सावरकरांच्या हस्ते अनंत दामले यांना “नूतन पेंढारकर”ही पदवी देऊ केली आणि सावरकर अनंत दामले यांच्या कानात हळूच म्हणालेही, “पदवी मिळविणे सोपे असते पण टिकविणे कठीण असते बर!”. पुण्यातील ‘भारत गायन समाज’ हे अनंत दामले यांचे श्रद्धास्थान होते.
अनंत दामले यांनी सत्तेचे गुलाम, कृष्णार्जुन युद्ध, संगीत सौभद्र, संगीत शारदा संगीत संशयकल्लोळ संगीत पंढरपूर रीती अशी प्रीतीची, संगीत मृच्छकटिक, सुवर्णतुला, शारदा अशा अनेक नाटकात कामे केली. अनंत दामले यांचे ९ ऑक्टोबर १९९९ रोजी निधन झाले.
Leave a Reply