सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांचा जन्म ७ जु्लै १९६२ रोजी झाला.
ध्येयनिष्ठा, कलाप्रेम, अथक परिश्रम करण्याची वृत्ती, जिद्द, अभ्यासूपणा, नम्रता, सामाजिक जाणीव, आई-वडील-भावंडे आणि गुरू यांच्यावरील प्रेम, निष्ठा, आदर आणि कृतज्ञता इत्यादी गुणांनी माणूस घडतो; मोठा होतो. पद्मजा फेणाणी यांच्या मध्ये हे सारे गुण आहेत.
पद्मजा फेणाणी यांना पं. जसराज, पं. रामनारायण आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारखे दिग्गज गुरू लाभले; स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांकडून प्रोत्साहन लाभले. दुर्गा भागवत आणि ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचा स्नेह व मार्गदर्शन लाभले. पु. ल. देशपांडे व कवी कुसुमाग्रजांसारख्यांचे आशीर्वाद लाभले.
मराठी चित्रपटातील शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांबाबतचा ‘मियाँ तानसेन पुरस्कार’ पद्मजाला १९८८ मध्ये मिळाला. त्याच वर्षी प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘भारत निर्माण’ हा पुरस्कार त्यांना लाभला होता. नोव्हेंबर २००० मध्ये ‘माणिक वर्मा’ पुरस्काराने पद्मजा फेणाणी यांना गौरवले गेले होते. २००१ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने पद्मजा फेणाणी यांना गौरवले.
‘बहरलेल्या सावल्या’ ही शंकर रामाणींची कविता पद्मजा यांनी गायल्यानंतर कवी ग्रेस तिला म्हणाले होते, “निर्झरी पैंजणांचा आनंद तुम्ही आम्हाला दिलात! मला असे शब्द का सुचले नाहीत? तुम्ही गायलेली ही कविता कुणाची आहे हे तुम्ही मला मुळीच सांगू नका! अगदी ती शंकर रामाणींची असली तरी!”
‘निवडुंग’ चित्रपटातील ‘केंव्हा तरी पहाटे’ आणि ‘लव लव करी पात’ ही गाणी पं. हृदयनाथ मंगेशकरांनी पद्मजा यांच्या ऐन तारूण्यात गायला देऊन विश्वास प्रगट केला होता.
Leave a Reply