(1884 – 1967)
युरोपातील क्रांतिकारकांशी संपर्क साधून पारतंत्र्यातील भारताला सशस्त्र क्रांतिद्वारे मुक्त करण्याचे प्रयत्न करणारे धडाडीचे क्रांतिकारक म्हणून पांडूरंग सदाशिव खानखोजे प्रसिध्द आहेत. काही काळ मेक्सिकोत वास्तव्य करणाऱया खानखोजे यांनी तिथे कृषिक्षेत्रात संशोधन करुन आपल्या उत्तर आयुष्यात भारतात परतून कृषितज्ञ म्हणूनही भूमिका वठवली.
खानखोजे यांचा जन्म वर्धा जिल्हयांतील पालकवाडी येथे 7 नोव्हेंबर, 1884 रोजी झाला. बालपणापासूनच त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढयाबाबत औत्युक्य होतं. पुढे लोकमान्य टिळकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी जपानमध्ये सैनिकी शिक्षण घेतल्यावर ते अमेरिकेत गेले. तिथे कॅलिफोर्निया या वॉशिंग्टन विद्यापीठांतून त्यांनी शेतकी विषयात पदव्यूत्तर शिक्षण घेतलं. शिक्षण सुरु असतानाच त्यांनी `इंडियन इंडिपेंडन्ट पार्टी`ची स्थापना करुन भारतातील क्रांतिकारकांना बाहेरुन मदत करण्याचं कार्य सुरु केलं.
पहिल्या महायुध्दाच्या काळात ते पश्चिम आशियात आले असतांना ब्रिटिश पोलिस त्यांच्या मागे लागले. त्यामुळे ते इराणला गेले. तिथे काही काळ कृषितज्ञ म्हणून नोकरी केल्यावर युरोपातील अनेक देशांत राहून ते क्रांतिकार्य करत होते. इ.स. 1924 मध्ये ते मेक्सिको इथे स्थायिक झाले.
मेक्सिकोत त्यांनी कृषिविषयक महत्वाचं संशोधन केलं आणि त्याबद्दल `नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्स` या संस्थेतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. पूढे भारत सरकारच्या विनंतीवरुन ते भारतात परतले आणि आपल्या कृषिक्षेत्रातील ज्ञानाचा येथील कृषिविकासासाठी वापर केला.
क्रांतिकारक व कृषितज्ञ अशी दुहेरी लोकाभिमुख भूमिका करणार्या खानखोजे यांचं 18 जानेवारी 1967 रोजी नागपूर इथे निधन झालं.
## Pandurang Sadashiv Khankhoje
Leave a Reply