मराठी चित्रपटसृष्टीत असे खूप गुणवंत आहेत ज्यांच्या कलेची व्हावी तशी कदर झाली नाही आणि त्यांच्या योग्यतेच्या तुलनेत त्यांच्या पदरी तसे फार यश पडले नाही. दिग्दर्शक आणि छायाचित्रकार प्रभाकर निकळंकर हे अशांपैकीच एक होते.
धनंजय, शूरा मी वंदिले, सवाई हवालदार, महानदीच्या तीरावर अशी त्यांच्या चित्रपटांची नावे लोकांना माहीत आहेत. परंतु निकळंकरांची ओळख तेवढीच नाही. एकूणच चित्रपटसृष्टीविषयी, त्यातील नवीन घडामोडींविषयी ते अत्यंत अभ्यासूपणे आपली निरीक्षणे नोंदवीत असत आणि वैयक्तिक अपयशाचा पाढा वाचण्याचे कटाक्षाने टाळत असत. निकळंकरांचा जन्म मराठवाडय़ातील जालनानजीकच्या फुलंब्री गावचा. त्यांच्या विवाहित बहिणीमुळे ते मुंबईला आले आणि मग इथलेच झाले.
त्यांचे मेव्हणे फेमस सिने लॅबोरेटरीमध्ये इन्चार्ज होते. त्यांच्या ओळखीमुळे निकळंकरांना छायाचित्रकार भगवान पालव यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. हे पालव म्हणजे मास्टर भगवान यांचे बंधू. या वाढलेल्या ओळखीमुळे पुढे निकळंकरांना प्रसिद्ध छायाचित्रकार जाल मिस्त्री आणि फली मिस्त्री यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम करण्यास मिळाले आणि त्यांच्या कारकीर्दीला दिशा मिळाली. या दोघांमुळे त्यांचा हिंदीतला राबता वाढला आणि आत्मविश्वासही वाढला. त्यामुळेच ते मग मराठी चित्रपटांच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळले आणि त्यातूनच धनंजय या चित्रपटाचा जन्म झाला. मराठीतील त्या काळचे अत्यंत लोकप्रिय रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांच्या कथेवरून आणि त्यातील लोकप्रिय व्यक्तिरेखेवरून हा चित्रपट बेतला होता.
त्याच सुमारास भारतावर परकीय आक्रमणाची छाया होती. त्या वातावरणात निकळंकर यांनी संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या भागीदारीत ‘शूरा मी वंदिले’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाद्वारे मोहम्मद रफी यांचे मराठी चित्रपटसृष्टीत आगमन झाले. श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली या चित्रपटातील ‘अरे तू दु:खी जिवा’ ही गझल रफी यांना एवढी आवडली की त्यांनी ती गाण्यासाठी मानधन घ्यायचे नाकारले आणि केवळ गुलाबाचे एक फूल द्यावे, असा आग्रह धरला.
विद्याधर गोखले यांच्या कथेवर निकळंकरांनी ‘सुंदरा सातारकर’ बेतला होता. त्यातून रमेश भाटकर, विजय गोखले हे कलावंत चित्रपटात आले.
उत्तम कथानक आणि साहित्यमूल्य यांचा ते आग्रह धरीत. त्यामुळेच दुर्गा भागवतांनी आदिवासी जीवनाचा केलेला अभ्यास त्यांना खुणावत होता आणि त्यातूनच त्यांनी ‘महानदीच्या तीरावर’ला आकार दिला. उत्तम चित्रदृष्टी आणि कथेची जाण असूनही निकळंकर कदाचित त्यांच्या संकोची स्वभावामुळे असेल कायम दुसऱ्या फळीतच राहिले.
आज मराठीत जसे प्रयोग होत आहेत तसे त्या काळी झाले असते तर निकळंकर नक्कीच अधिक काहीतरी करून दाखवू शकले असते.
## Prabhakar Nikalankar
Leave a Reply