कोकणातील नारळाला कल्पवृक्ष म्हटले जाते. हे लहानपणापासून त्यांच्या विविधांगी उपयोगितेच्या चर्चेसह आपण वाचत आलो आहोत. मात्र, नारळाच्या ज्या विविधांगी उपयोगितेची आपण चर्चा करतो ती नुसतीच चर्चा राहू नये यासाठी कोकणी माणसांनी काय प्रयत्न केले आहेत, याबाबतही कृतीसह चर्चा होण्याची गरज आहे. कोकणातील खेकडा वृत्तीची चर्चा केव्हाही कोंकणी माणूसच अधिक करताना दिसतो तो केवळ त्या अनुभवामुळे आलेल्या नैराश्यापोटीच. पण वेंगुर्ल्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रज्ञा प्रदीप परब यांनी ‘कल्पवृक्ष कन्येसाठी…!’ या गाण्याचे बोल सार्थक करीत महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था, मर्यादित वेंगुर्लाचे सक्षमपणे व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. महिला सक्षमीकरणास आदर्शवत् असे कार्य कोकणातील या महिला काथ्या कामगार प्रकल्पाद्वारे उभे राहिले आहे, जे संपूर्ण देशातील एकमेव महिलाप्रधान काथ्या उद्योग असलेले हे महाराष्ट्रातीलही या उद्योगाचे एकमेव उदाहरण आहे.
सिंधुदूर्ग जिल्हयातील नवयुग महिला विकास सहकारी पतसंस्था मर्यादित, सागरेश्वर महिला पर्यटन सहकारी संस्था मर्यादित आदींचे अध्यक्षपद समर्थपणे भूषविताना सावित्रीबाई फुले महिला सहकारी पतसंस्था, मर्यादित, सूर्यकांता महिला औद्योगिक सहकारी संस्था यांचे संचालकपदही सौ. प्रज्ञा प्रदीप परब सांभाळीत आहेत. सिंधुदूर्ग जिल्हा न्याय विधी प्राधिकरण आणि वेंगुर्ला तालुका दक्षता समिती व वेंगुर्ला महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित संस्थांच्या त्या सदस्याही आहेत. सिंधुदूर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या उपाध्यक्षा असलेल्या सौ.प्रज्ञा परब यांना महाराष्ट्र सरकारने अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करून नारीशक्तीचा यथोचित गौरवही केला आहे.
कोकण विकास मंडळामध्ये सेवेत असलेल्या प्रज्ञाताईंनी ग्रामीण विकास यंत्रणा, क्वायर बोर्ड, जिल्हा उद्योग केंद्र आणि अन्य माध्यमातून काथ्या कामगारांचे ट्रेनिंग सेंटरही चालविले. महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेतील सध्याची गुंतवणूक सुमारे दीड कोटीपर्यंत असताना ती केंद्र सरकारकडे प्रोजेक्ट सादर करून पाच कोटींपर्यंत वाढविण्याची मानसिकता या उद्योगाला नजिकच्या काळात गरूडझेप घेण्यास प्रवृत्त करणार आहे. केरळ राज्यात १०० टक्के जर या उद्योगाचे अस्तित्व मानले तर महाराष्ट्रातील हा एकमेव काथ्या उद्योग असल्याने स्पर्धा नाही आणि मागणी अधिक असल्याने हा प्रकल्प पूर्णवेळ कार्यरत आहे.सध्या शेकडा ६५ रूपयांपर्यंत स्क्रॅप खरेदी करणा-या या उद्योगाने ग्रीन हस्टसाठी शेतक-याला थेट मालपुरवठा केल्यास चांगला मोबदला देण्याची तयारी ठेवली आहे. शेतक-याच्या बागेत ३० ते ५५ रूपये मोबदला देऊन वाहतूकही वाचविली आहे.
मात्र, तामीळनाडू, केरळसह दाक्षिणात्य राज्यांत वर्षांतून ११ वेळा नारळ काढणी केली जाते तर कोकणात सहसा नारळ काढले जात नाहीत तर ते पडण्याची वाट पाहिली जाते. कोकणात नारळ काढण्याचे प्रमाण वर्षातून केवळ ३ वेळा असे आहे. यामुळे शेतक-याने ३ महिन्यापेक्षा अधिककाळ नारळ झाडावर अनावश्यकरित्या ठेवल्यास झाडांच्या पुढील पिकावर दुष्परिणाम होतो. पण यासाठी शेतक-यांचे प्रबोधन व्यापक प्रमाणावर करण्यासाठी प्रज्ञाताई प्रयत्नशील आहेत. नारळ हिरव्या रंगाचा असतानाच काढण्यात आला तर शेतक-यांना अधिक पिक मिळण्यासोबतच उत्पन्नातही भरघोस वाढ करता येईल, असा त्यांचा विश्वास आहे. या वाढीव प्रोजेक्टसाठी व्हर्जिन ऑईल प्रॉडक्ट तयार करण्यासंदर्भात जे नारळ खरेदी करावे लागणार आहेत. ते कोकणातीलच उत्पादन असावे म्हणजे शेतक-यांना करवंटी, ग्रीनहस्ट, खोबरे आणि तेल यांच्या उत्पादनामुळे अधिक मोबदला देता येणार असल्याचे त्या सांगतात.
महाराष्ट्रातील एकमेव महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था असल्याने या संस्थेला शाळांतील विद्यार्थ्यांच्या बैठका बनविण्याचे मोठे काम मिळणार होते. मात्र, अचानक साऊथ इंडियन लॉबी सक्रीय झाल्याने काहीशी अडचण निर्माण झाली. देशातील बिग बझार सारखे मॉल्स या संस्थेचे विक्री केंद्र असून येथे बनविले जाणारे काथ्यापासूनचे प्रत्येक उत्पादन ग्राहकांकडूनच शोध घेत खरेदी केले जात आहे. काथ्याचे दोर, वॉलपीस, मॅटस्, खेळणी, गांडूळखत अशी विविध उत्पादने इकोफ्रेंडली तर आहेतच शिवाय टिकाऊ आणि आकर्षकही असल्याने ही उत्पादने बनविण्यासाठी होणा-या मेहनतीला योग्य दामही मिळत आहे. या काथ्यानिर्मितीदरम्यान तयार होणा-या भुशाचेही महत्व केवळ खेळणी अथवा गांडूळखत निर्मितीपुरतेच मर्यादित नसून हा कोकोपीट भुसा त्याच्या वजनाच्या ६ पट पाणी शोषून घेण्यासाठी उपयुक्त असल्याने बागेतील हिरवळ म्हणजेच लॉन तयार करण्यासाठी याचा मोठया प्रमाणात गार्डनिंगमध्ये वापर होतो.
साऊथ इंडियन राज्यांत सबसिडी आणि कर्जमाफी असल्याने ते उद्योग पूर्ण भरात असून व्यावसायिक स्पर्धेत महाराष्ट्रातही आघाडीवर राहतात पण महाराष्ट्रात मात्र, शेतक-याला जेवढे उत्पन्न तेवढेच सरकारला व्हॅटद्वारे कररूपी उत्पन्न देणारा हा काथ्या उद्योग महिला बचत गटांमार्फतही चालविला जात आहे. या भागात सुमारे साडेपाचशे महिला बचतगटांची निर्मिती या उद्योगामुळे शक्य झाली आहे. मुंबईसारख्या महानगरात प्लास्टीक प्रदुषणामुळे गटारे तुंबण्याचे प्रकार नारळाच्या चोथ्यामुळेच अधिक असल्याचे सर्वेक्षणांती दिसून आल्याने मुंबई महानगरपालिका जागा उपलब्घ करून या काथ्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी विचार करीत आहे. तळकोकणातील या आदर्श काथ्या प्रकल्पात ग्रीन हस्ट ग्रायडींगपासून काथ्या वळणे आणि कोंबिंग व अन्य मशिनरीवर केवळ महिला कामगार असून त्या प्रामाणिक असल्याने त्यांच्यावर कोणीही सुपरवायझर नाही, हे खास वैशिष्ठय आहे. राज्यातील महिला सक्षमीकरणाचा हुंकार वेंगुर्ल्यातून दिला गेला आहे आणि त्याचे कोकणभर नारीशक्तीच्या जागरात रूपांतर होण्यासाठी राज्यसरकारने अधिक सहकार्याचे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
सौ. प्रज्ञा प्रदीप परब
मोबाइल क्र. ९४२२०६४६८२
Leave a Reply