प्रकाश केशव जावडेकर

Javadekar, Prakash Keshav

भारत सरकारमध्ये मानव संसाधन मंत्रालयाचा (Human Resources Development) कार्यभार सांभाळणारे श्री प्रकाश जावडेकर हे एक लोभस व्यक्तिमत्त्व. सतत हसतमुख असणं हे त्यांच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्यच आहे. त्यांचा जन्म ३० जानेवारी १९५१ रोजी पुणे येथे झाला.

पुणेकर असलेले श्री जावडेकर हे गेली कित्येक वर्षे भाजपा, जनसंघ आणि रा.स्व. संघाचे कट्टर कायकर्ते आहेत. आाणिबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. त्यांचे वडील केशव कृष्ण जावडेकर हे हिंदू महासभेचे कार्यकर्ते आणि नेते होते.

प्रकाश जावडेकर यांनी पुणे विभागातून दोन वेळा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व केले. ते महाराष्ट्र सरकारच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्षही होते. महाराष्ट्र भाजपाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी अनेक वर्षे सांभाळल्यानंतर त्यांना केंद्रात बोलावून घेण्यात आले आणि केंद्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली. ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. तब्बल तीन निवडणूकांमध्ये त्यांनी पक्षप्रवक्त्याची जबाबदारी सांभाळली.

२०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये त्यांचा समावेश झाला. त्यांच्याकडे पर्यावरण आणि माहिती नभोवाणी खात्यांचे स्वतंत्र पदभार असलेले राज्यमंत्रीपद सोपविण्यात आले. सध्या ते केंद्रात पर्यावरण मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

कोणत्याही प्रकारचा राजकीय गॉडफादर त्यांच्या पाठीशी नसतानाही एक सामान्य कार्यकर्ता ते केंद्रात मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्यांची निष्ठा, तळमळ आणि चिकाटी यांचे दर्शन घडवितो.

यापूर्वी त्यांच्याकडे पर्यावरण खात्याचा स्वतंत्र कारबार होता. पर्यावरण मंत्री या नात्याने महाराष्ट्राची अनेक वर्षे रखडलेली अनेक प्रकल्यांच्या मंजूरीची कामे त्यांनी मार्गी लावली. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीत त्यांचा मोठा सहभाग आहे आणि महाराष्ट्र त्यांच्याकडे नेहमीच आदराने पहात राहील.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.