ज्यांनी भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाचे योगदान दिले, अशा व्यक्तींमध्ये चीफ-जस्टीस प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. जस्टीस गजेंद्रगडकर यांचा जन्म १६ मार्च १९०१ साली झाला. ते मूळचे कर्नाटकातील गजेंद्रगड या गावचे राहणारे. गजेंद्रगडकरांचे घराणे विद्वानांचे घराणे होते. जस्टीस गजेंद्रगडकर यांचे वडील बालाचार्य हे संस्कृत विद्वान होते. प्रल्हाद हे त्यांचे कनिष्ठ पुत्र.
मुंबई कोर्टात वकिली करीत असताना त्यांनी `हिंदू लॉ’ या त्रैमासिकाचे संपादन केले. संपादक म्हणून त्यांची खूप प्रशंसा झाली. या मासिकाच्या `दत्तक मीमांसा’ या विषयावरील विशेषांकाची खूपच तारीफ झाली. त्यामुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. मुंबई बारची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. न्यायवैद्यक शास्त्रातही त्यांनी खूप नाव कमावले.
सन १९४५मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेथे ११ वर्षे न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर १९५६ साली त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली आणि १ फेब्रुवारी १९६४ रोजी ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले. सुमारे दोन वर्षे ते या पदावर होते आणि १५ मार्च १९६६ रोजी ते निवृत्त झाले.निवृत्तीनंतर १९६७ साली त्यांची मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली.
भारतीय न्यायव्यवस्थेत बहुमोल कामगिरी करण्याबरोबरच गजेंद्रगडकर घराण्याच्या परंपरेचा वारसाही त्यांनी सांभाळला. त्यांच्या वडिलांप्रमाणेच तेही `मुखस्त विद्वान’होते. वेदांचा आणि उपनिषदांचा त्यांनी गाढा अ भ्यास केलेला होता. `भारतीय विद्या भवन’ या संस्थेने प्रकाशित केलेल्या `द टेन क्लासिकल उपनिषदाज’ या ग्रंथ मालिकेचे ते संपादक होते.
सुमारे दोन वर्षे समाजपरिवर्तनासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या काळात या समितीने जातीनिर्मुलन आणि अस्पृश्यतानिवारण यांमध्ये भरीव कामगिरी केली. याव्यतिरिक्त त्यांनी वेळोवेळी अनेक समित्यांचे प्रमुखपद भूषविले.
न्यायव्यवस्थेत केलेल्या बहुमोल कामगिरीबद्दल १९७२ साली भारत सरकारने त्यांना `पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
वयाच्या एशीव्या वर्षी, १२ जून १९८१ रोजी त्यांचे निधन झाले.
(सौजन्यः महान्यूज)
Leave a Reply