ग्रँडमास्टर किताब मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळपट्टु प्रवीण ठिपसे यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५९रोजी झाला. त्यांनी हा किताब १९८४ साली मिळवला.
प्रवीण ठिपसे यांचे वडील डॉ. महादेव ठिपसे हे महात्मा गांधींचे अंगरक्षक होते. स्वातंत्र्यलढय़ासाठी १० वर्षे दिल्यानंतर ते डॉक्टर झाले आणि त्यांनी मुंबईत प्रॅक्टिस सुरू केली. प्रवीण यांच्या आईनी आपल्या सर्व मुलांना बुद्धिबळाचं वेड लावलं. तेही इतकं की, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ही मुलं खेळायचा आग्रह करत.
बुद्धिबळाचे क्लिष्ट धडे ते अत्यंत सोप्या शब्दात धाकटय़ा दोघा भावांना देत. त्यांची ही हातोटी बघून पुढे अनेक वर्षांनी महाराष्ट्र शासनाने त्यांना बुद्धिबळ प्रशिक्षणासाठीचा मानाचा ‘दादोजी कोंडदेव पुरस्कार’ देऊन गौरवले होते.
आईची एक आठवण सांगताना म्हणतात. ‘‘१९७० मध्ये मी आठवी-नववीत असताना आमच्या शाळेने आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्याविषयी अनास्था दाखवल्याने आईने शाळा बदलण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ती दादरच्या बालमोहन शाळेत जाऊन दादासाहेब रेगे यांना जाऊन भेटली.
बुद्धिबळावर ज्यांनी १०० च्यावर पुस्तकं लिहिली आहेत, असे रशियाचे प्रसिद्ध खेळाडू युरी अवेरबाख भारतात आले असताना, ते एकाच वेळी २५ अव्वल खेळाडूंशी खेळतील असं जाहीर करण्यात आलं. त्यांपैकी २४ खेळाडूंना त्यांनी हरवलं. त्यांची एकच मॅच बरोबरीत सुटली. तो प्रतिस्पर्धी होता प्रवीण ठिपसे, वय वर्ष १५.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच बुद्धिबळ ऑलम्पियाड, एशियन टीम चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा प्रवीण ठिपसे यांचा सिलसिला सुरू होता. बुद्धिबळातील पराक्रमामुळे १९ व्या वर्षी छत्रपती पुरस्कार, २३व्या वर्षी अर्जुन पुरस्कार आणि पंचविशीच्या आतच ग्रॅण्डमास्टर किताबासाठी पहिला परफॉर्मन्स असा त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला. प्रवीण ठिपसे यांची पत्नी भाग्यश्री साठे ठिपसे या महिला इंटरनॅशनल मास्टर आहेत.
Leave a Reply