पुरुषोत्तम शिवराम रेगे (पु. शि. रेगे)

मराठी वाङ्मयविश्वात कवी, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक व संपादक अशी ओळख असलेल्या पु.शी.रेगे उर्फ पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म २ ऑगस्ट १९१० रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मिठबाब येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व लंडन येथे बी.ए. पर्यंत झाले होते. लंडनच्या “स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स“ मधून त्यांनी बी.एस्सी. ची पदवी संपादन केली होती. अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून विविध महाविद्यालयांतून त्यांनी काम केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले.

रेगे पाश्चात्य काव्याच्या काही लकबी मराठीत आणण्याचा प्रयत्न करीत होते. इटालियन कवींच्या प्रेमकवितांनी व त्यातून वाहणार्‍या उत्कट अशा मनोहर भावनांनी त्यांच्या कवीमनावर भुरळ पाडली होती. म्हणून त्यांच्या कवितांमधून स्त्री शक्ती आणि तिचे स्त्री देहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या स्वप्निल रूपांमध्ये प्रकट होताना दिसते.

संस्कृतप्रचुर शब्दकळांची सतत होणारी मधुर पखरण हेदेखील त्यांच्या कवितांचे अनोखे वैशिष्टय होते. रेगे यांचे जीवनविषयक विचार ऐकले की साहित्याप्रती त्यांनी बाळगलेली निष्ठा व निरपेक्ष प्रेम लगेच कळून येते. “जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही उरणार आहे“; अशी त्यांची श्रध्दा व धारणा होती.

“फुलोरा“, “दोला“, “गंधरेखा“, “पुष्कळा“ , “दुसरा पक्षी“, “आणि प्रियाळ“ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत; “रूपकथ्थक“, “मानवा“ यांतील काही कथा गुजराती, फ्रेंच, जर्मन, स्वीडिश, स्पॅनिश ,रशियन आणि चिनी या भाषांत भाषांतरित झाल्या आहेत. तसेच “सावित्री“, “अवलोकिता“, “रेणू“ , आणि “मातृका“ या कादंबर्‍या दर्जेदार व अर्थपूर्ण आहेत. “छांदसी“ हा रेगेंच्या समीक्षालेखांचा संग्रह असून १९६८ मध्ये त्याची सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली आहे.

रंगपांचालिक आणि दोन नाटके या त्यांच्या संग्रहामध्ये “माधवी: एक देणे“ ,’रंगपांचालिक“ आणि “कालयवन’ अशी तीन छोटी नाटके समाविष्ट झाली आहेत. रेगे यांच्या या नाटकालाही काव्यामयता लाभलेली असून, या नाटकांची त्यांनीच हिंदीत भाषांतरे केली आहेत. त्याचबरोबर “पालक“ , “मध्यतंर“ व “चित्रकामारव्यम्“ ही नाटुकली नियतकालिकांतून प्रसिद्ध झाली आहेत.

पु.शि.रेगे यांनी १९६५ मध्ये रशियाचा येथे मॉस्को लघुकथा या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात एक भारतीय प्रतिनिधी म्हणून त्यांनी सहभाग घेतला होता. १९६५ मध्ये केरळ येथे झालेल्या अखिल भारतीय लेखक परिषदेचे ते उद्घघाटक होते. वर्धा येथे १९६७ साली आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

१७ फेब्रुवारी १९७८ रोजी पु.शि.रेगे यांचे मुंबईत निधन झाले.

1 Comment on पुरुषोत्तम शिवराम रेगे (पु. शि. रेगे)

  1. “त्रिधा राधा…”
    ही माझी रेगे यांची सगळ्यात आवडती कविता…
    तीन कडव्यातून व्यक्त होणारी त्रिधा राधा…
    आणि तिच्या भाववृत्तीला साजेलशा रूपात
    स्वत:च्या अस्तित्वाची ग्वाही देणारा… तिचा हरी…
    काम… प्रेम… आणि ज्ञान असा हा प्रवास…
    “त्रिधा राधा…”
    खालील लिंक वर जरूर ऐका
    https://youtu.be/W2dPI8ZTJ0c

Leave a Reply

Your email address will not be published.


*