भावे, पुष्पा

Bhave, Pushpa

 

एक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्‍या लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जातात. पुष्पा भावे यांचा जन्म २६ मार्च १९३९ सालचा. पूर्वाश्रमीच्या त्या सरकार घराण्यातील. उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध आहेत. सामाजिक कार्याची त्यांना मुळातच आवड होती. त्यांचे उच्चशिक्षण एलफिस्टन महाविद्यालयात झाले. मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी एम. ए. ची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर मुंबई येथे सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, म. ल. डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या. पुष्पा भावे या एक प्रभावी वक्त्या आहेत. अतिशय मुद्देसूद आणि विद्वत्तापूर्ण असे त्यांचे वक्तृत्त्व ऐकणार्‍याला वैचारिक खाद्य देते. त्यांचे भाषण म्हणजे श्रोत्यांना एक प्रकारची मेजवानीच असते. त्यांनी अनेक विषयांवर लेखन केले. त्यापैकी ‘अभिरूची ः ग्रामीण आणि नागर’ (संपादक – गो. म. कुलकर्णी, ‘मराठी
टीका’ (संपादक – वसंत दावतर), ‘महात्मा फुले गौरव ग्रंथ’ इ. ग्रंथांसाठी त्यांनी लिखाण केले आहे. या शिवाय विविध ज्ञानविस्तार लेख सूचीचे संकलनही त्यांच्या नावावर आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*