साहित्य मीमांसक, कवी आणि एक विचारवंत म्हणून रा. श्री. जोगांची ओळख आहे. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज या गावी १५ मे १९०३ रोजी झाला.
त्यांचे वडील श्रीपाद बाजी जोग हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. रा. श्री. जोग यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले. तर पदवीपर्यंतचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी एम. ए. केले. त्यानंतर प्राध्यापक म्हणून नाशिकच्या हंसराज प्रागजी, सांगलीच्या विलिग्डन आणि पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून मराठी आणि संस्कृत त्यांनी शिकवले. त्यानंतर पुणे विद्यापीठात त्यांची विशेष अध्यापक म्हणून नेमणूक झाली.
सुरुवातीच्या काळात जोग ‘निशिगंध’ या नावाने काव्य लिहित असत. त्यांचे ‘ज्योत्स्नागीत’, ‘निशागीत’, ‘साराच वेडेपणा’ इ. काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. पण पुढील काळात काव्यतत्त्व विवेचक म्हणूनच रा. श्री. जोगांचा लोकांना परिचय झाला. आधुनिक पाश्चात्य साहित्य शास्त्रातील संकल्पनांचा अर्वाचीन प्रकारांशी तुलना करणारा साहित्य शास्त्राचा अभ्यासपूर्ण असा त्यांचा ‘अभिनव काव्यप्रकाश’ नावाचा पहिला ग्रंथ प्रकाशित झाला. त्यानंतर याच ग्रंथात आलेले काही विचार, छंद व अलंकार यांचा सविस्तर विस्तार ‘काव्यविभ्रम’ या त्यांच्या ग्रंथात दिसून येतो. साहित्यातील सौंदर्य व त्यातून मिळणारा रसिकांचा आनंद कसा असतो यावर रा.श्री. जोगांनी आपल्या ‘सौंदर्यशोध आणि आनंदबोध’ या ग्रंथात उहापोह केला आहे.
कलेच्या ध्येयातून सौंदर्य दर्शन करून जीवनाचा आनंद मिळवणे हा अभिरूची पूर्ण विचार जोगांच्या चितनाचा आणि लेखनाचा विषय होता. मराठी वाङ्मयाभिरूचीचे विहंगमावलोकन ‘चर्वण’ या लेखसंग्रहातून उद्धृत झालेलं दिसतं. ‘अर्वाचीन मराठी काव्य’, ‘मराठी कविता १९४५-६०’, ‘केशवसुत काव्यदर्श ’, ‘समग्र माधव ज्युलियन’, ‘वाङ्मयविमर्श’, ‘मराठी समीक्षा’, ‘दक्षिणा’ इ. ग्रंथातून एक मर्मग्राही समीक्षक म्हणूनही त्यांचे आपल्याला दर्शन होते. त्यांच्या ग्रंथातून कला आणि साहित्य याविषयीचे एक संपूर्ण तत्त्वज्ञान प्रकट होते. मराठी साहित्य परिषदेच्या ‘वाङ्मयेतिहासाचे खंड ३, ४ व ५’ या ग्रंथांचे संपादनही त्यांनी केले आहे.
१९६० साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषविले होते.
अशा या विचारवंत साहित्यिकाचे २१ फेब्रुवारी १९७७ साली निधन झाले !
Leave a Reply