राजमाता जिजाबाई (जिजाऊ)

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, राजमाता जिजाबाई. महाराजांना त्यांनी घडवलं आणि महाराष्ट्राचं बवितव्यच बदललं.

जिजाऊ या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. इ.स. १६०५ मध्ये जिजाबाई आणि शहाजीराजांचा विवाह झाला. पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला असता, जिजाबाई आपल्या पतीशी कायम एकनिष्ठ राहिल्या. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.

राजांचे संगोपन आणि कुशल कारभार

शिवाजीराजे १४ वर्षांचे असतांना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. दादोजी कोंडदेव व इतर कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, अदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेवांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला, शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. त्यांच्यावर संस्कार घडवले.

आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत. राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले. राजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नात जिजाबाईंच्या प्रेरणेचा खूप मोठा हातभार होता.

जीवन

शहाजी राजांनी बंगळूरात तुकाबाईंशी दुसरे लग्न केल्यावर जिजाबाईंच्या वाटयाला फारसे पती प्रेम व राजांच्या वाटयाला पिताप्रेम आले नाही. परंतु आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.

राजांच्या प्रथम पत्नी सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती. राजांचाही त्याला पाठींबा होता. या धर्म-राजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढंच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज सोयरिक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णतः जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.

शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर थोडयाच दिवसांत, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*