मराठी चित्रपटांमध्ये राम गबाले दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक म्हणून ख्यात असून रुपेरी पडद्यावर देशभक्तीपर आणि सामाजिक विषयांवर तसंच लहान मुलांसाठी उत्तमोत्तम चित्रपट तयार करण्यात त्यांचा समावेश होता. मास्टर विनायक यांच्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ या संस्थेतून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करत चित्रपटनिर्मिती व दिग्दर्शनात स्वत:चा ठसा त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीवर उमटवला. मराठी चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या प्रदीर्घ काळातत त्यांनी ७० हून अधिक दर्जेदार चित्रपट केले.
“देवबाप्पा” चित्रपटात चंदाराणीच्या भूमिकेसाठी मेघना गुप्ते या चुणचुणीत मुलीची निवड त्यांनीच केली होती. पुढे तिची ही भूमिका खुपच गाजली व बाल चित्रपट यशस्वीरीत्या सादर करणारा एक मेहनती दिग्दर्शक म्हणून गबाले यांचे नाव झाले. पु. ल. देशपांडे यांच्या ‘बटाटय़ाची चाळ’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी गबालेंचा सक्रिय सहभाग होता. राम गबाले यांनी काही हिंदी सिनेमेही केले पण तेथे त्यांचं मन रमले नाहीत.
राम गबाले यांनी मुंबई व दिल्ली दूरदर्शनसाठी शंभराहून अधिक अनुबोधपट, व्हिडिओ फिल्म्स, मालिका आणि टेलिफिल्मशी निर्मितीही त्यांनी केली होती. निर्माता आणि लेखक या नात्याने ते या माध्यमाशी निगडित होते. रिचर्ड अॅटनबरो यांना ‘गांधी’ या चित्रपटासाठी नियोजन करण्यासाठी त्यांनी विशेष सहकार्य केले होते. “दूधभात”, “वंदेमातरम्”, “देवबाप्पा”, “जशास तसे”, “मोठी माणसे”, “पोस्टातली मुलगी”, “छोटा जवान” हे त्यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या प्रमुख व लोकप्रिय चित्रपट.
राम गबाले यांना ”छोटा जवान” व ”जिव्हाळा” या चित्रपटांसाठी महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठींच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं असून ”फूल और कलियाँ” या चित्रपटासाठी “पंतप्रधानांचे सर्वोत्तम बालचित्रपटाचे सुवर्णपदक, “काले गोरे” या चित्रपटासाठी लाइपत्सिगच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कार व “द स्टोरी ऑफ डॉ. कर्वे” साठी देखील राज्य पारितोषिकानं पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. याशिवाय “गदिमा पुरस्कार” महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार “अल्फा टीव्ही मराठीचा अल्फा जीवनगौरव पुरस्कार” ने गौरविण्यात आलेलं आहे.
कोल्हापूरहून पुण्याला आल्यानंतर राम गबाले यांची चित्रपट व्यवसायाच्या निमित्ताने गीतकार ग. दि. माडगूळकर, पु.ल. देशपांडे, वसंतराव देशपांडे व वसंत सबनीस यांच्याशी मैत्री जुळली होती. या सार्या जीवलगांशी अनुभवलेले मैत्रीचे किस्से आणि त्यांच्या सिनेमाच्या रंजक गोष्टी त्यांनी आपल्या ‘आत्मचित्र’ या आत्मकथनात शब्दबध्द केल्या आहेत.
Leave a Reply