ठाण्यातील नावाजलेल्या वकिलांमध्ये ज्येष्ठ अॅड. रमाकांत ओवळेकर हे सर्वांना परिचित होते. त्यांना आदराने अनेक जण ‘अण्णा’ म्हणत. कोर्टात युक्तिवादासाठी उभे राहिले की प्रतिवादी वकिलांना आता ‘अण्णा’ काय गुगली टाकतील याबद्दल उत्सुकता असे. सुमारे ५० हून अधिक वर्षे वकिली प्रॅक्टिस करणाऱ्या ‘अण्णां’चे गुरू होते अॅड. बाळासाहेब चिटणीस. त्याशिवाय पुण्याचे नामवंत वकील वसंतराव देशमुख यांच्याकडेही त्यांनी वकिलीचे मार्गदर्शन घेतले होते.
अॅड. ओवळेकर यांना मोठी प्रसिद्धी मिळाली ती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. आर. अंतुले यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या खटल्याने. त्यावेळी अंतुले यांना सिमेंट प्रकरणामुळे मुख्यमंत्रीपदावरून जावे लागले होते. मुंबईतील सेशन्स कोर्टात भाजपचे दिवंगत नेते रामदास नायक यांनी दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्यात अंतुले हे आरोपी होते. त्यात बचावासाठी अंतुले यांनी ओवळेकर यांची निवड केली. त्या काळात सिमेंटची टंचाई होती व सिमेंटच्या बदल्यात खरेदीदारांनी इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानला देणग्या द्याव्यात असे आदेश मुख्यमंत्री या नात्याने अंतुले यांनी दिल्याचा आरोप होता. मात्र या प्रतिष्ठानाचा व देणग्यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे ओवळेकर यांनी कोर्टात सिद्ध केले. त्यासाठी त्यांनी आपले सर्व वकिली कौशल्य पणाला लावल्याने अंतुले यांची खटल्यातून निदोर्ष सुटका झाली. त्या खटल्यात ‘अण्णां’च्यासोबत अॅड. नितीन प्रधान हेही होते. अंतुले खटल्याने ओवळेकर यांना जे यश मिळाले त्यातून त्यांच्या अभ्यासूपणा पुन्हा एकदा लोकांच्यापुढे आला. त्यांच्याबरोबर काम करायला मिळाले व त्यातून वकिली व्यवसायातील बारकावे समजल्याची कबुली नितीन प्रधान आजही देतात. त्यांच्या अन्य शिष्यांमध्ये मुंबई हायकोर्टाचे विद्यमान न्या. प्रमोद कोदे, न्या. यु. डी. साळवी व न्या. ए. आर. जोशी यांचाही समावेश आहे. त्यांची ठाणे जिल्हा कोर्टासह अलिबाग कोर्ट व मुंबई हायकोर्ट येथेही मोठी प्रॅक्टिस होती.
ओवळेकर स्वत:ला सिव्हिल ( दिवाणी) प्रॅक्ट्रिशनर म्हणत असत. तीच आपली खरी ओळख असल्याचेही ते सांगत. मात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे या दोन्हींमध्ये हातखंडा असलेला त्यांच्यासारखा वकील दुर्मिळच. वकिलीचा रूक्ष व्यवसाय आणि त्यातील कायद्यांची कलमे म्हणजे आणखीच गुंतागुंतीचे काम. मात्र हे काम करणार्या ओवळेकर यांना कलेचीही आवड होती. त्याशिवाय शिकारीचा छंद होता. त्यांचे ‘ दॅटस् ऑल माय लॉर्ड’ हे आत्मचरित्रही त्यांच्या वकिली व्यवसायातील अनुभवाबद्दल प्रसिद्ध आहे.
Leave a Reply