ज्यांच्या नावाने पुण्याचा संगीत महोत्सव अवघ्या भारतात नव्हे तर अवघ्या जगभरात गाजतो आहे व त्या महोत्सवात आपल्या गायनाची गुरूंची व घराण्याची गायकी गायला मिळावी म्हणून काही नवीन कलाकार कसोशीने प्रयत्न व प्रयास करत असतात. तसेच काही जेष्ठ व श्रेष्ठ गायक आणि वादक नेहमी हजेरी लावत असतात व त्यांच्या गायन वादनाने मंत्रमुग्ध होण्यासाठी सगळेच कानसेन त्या महोत्सवाची आतूरतेने वाट बघत असतात असा सवाई गंधर्व महोत्सव जो दर वर्षी पुण्यात न चुकता होतो व ज्याच्यां नावाने होतो ते सवाई गंधर्व उर्फ रामचंद्र गणेश कुंदगोळकर.
सवाई गंधर्वांचा जन्म १९ जानेवारी १८८६ रोजी हुबळी जवळच्या कुंदगोळ गावी झाला. उ.अब्दुल करीम खाँ हे त्यांचे गुरू. आपल्या गानकर्तुत्वाने त्यांनी आपल्या गुरूचे व पर्यायाने किराणा घराण्याचे नाव उज्ज्वल केले व हीच परंपरा त्यांच्या पुढच्या पिढीतील त्यांचे शिष्य भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांनी आसेतुहिमाचल व सातासमुद्रापार कायम ठेवली.
सवाई गंधर्वांचे गुरू अब्दुल करीम खाँ साहेबांचे वास्तव्य बराच काळ मिरजेस होते. उमेदीच्या काळात ते नेमके प्लेगच्या साथीत सापडले. त्यांचे पूर्वसंचीत थोर ईश्र्वरी कृपाप्रसादामुळे तसेच मिरजेच्या पीर ख्वाजांवरील श्रद्धेमुळे म्हणा त्यांनी दर्ग्यात जाऊन तशाही अवस्थेत आपली गानसेवा सादर केलेली फळास आल्यामुळे म्हणा पुढचा मार्ग सुकर झाला. उ.अब्दुल करीम खाँ साहेबांनी सवाई गंधर्वाना जवळ जवळ ८वर्षे गाण्याची तालीम देऊन घडविले.
त्यानंतरच्या काळात म्हणजे साधारणता १९०८ सालापासून सवाई गंर्धव रामभाऊ रंगभूमीकडे वळले. प्रारंभी ह.ना.आपटे यांच्या “संत सखू” नाटकातील भूमिकेमुळे त्यांचा नावलौकिक वाढला. त्यानंतर सुभद्रा, सखूबाई, तारा, द्रोपदी, कृष्ण, मीरा इ. भूमिका त्यांनी गाजविल्या. “सौभद्र” नाटकातील त्यांच्या सुभद्रेच्या भूमिकेने अमरावतीकरांना वेडे केले. त्यावेळेस प्रयोगस उपस्थित असलेल्या व शिर्डीच्या साईबाबांचे भक्त असलेल्या दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना सावई गंधर्व या बिरूदावलीने सन्मानित केले. पुढे तेच नाव सर्वश्रुत झाले. १९२८ साली गोविंदराव टेंबे यांच्या “तुलसीदास” नाटकातील “रामरंगी मन रंगले” हे पद त्यांनी गाजविले जे आजतागायत पं.भीमसेनजी गात आलेले आहेत. सवाई गंधर्व आपल्या बैठकीतून ख्यालाबरोबरच ठुमरी भजन नाटयसंगीत आवर्जुन म्हणत. पुढे १९४० ते ४५ दरम्यान त्यांच्या शंकरा, भैरवी, देसकार, मियाँमल्हार, सूरमल्हार, अडाणा, तिलंग, पूरियाधनाश्री, या रागांच्या ध्वनिमुद्रिका अतिशय लोकप्रिय झाल्या.
पुण्याचे आबासाहेब मुजुमदार यांचे घरी तसेच गिरगाव हैद्राबाद मिरजेच्या दर्ग्यासमोर त्यांच्या ज्या गाण्याच्या बैठकी गाजल्या त्याबद्दल खूप सांगण्यासारखं आहे. पं.रामकृष्णबुबा बझे केशवराव भोसले फैयाजखाँ यांच्या सारख्या दिग्ग्जांनी पण सवाई गंधर्व यांच्या गायनाची मुक्तकंठाने तारफिफ केली होती. त्यांनी गायलेली तोडी व विविध अशा अनेक रागातील बंदिशी सर्वश्रुत आहेत. “बिन देखे परे नही चैन” ही भैरवी याचा विशेषकरून उल्लेख करायला हवा कारण हया भैरवीची ध्वनिमुद्रिका दर वर्षी सवाई गंधर्व महोत्सवाच्या तिसर्या दिवसाची सांगता पं.भीमसेनजींच्या गाण्याने झाल्यावर आवर्जुन ऐकवली जाते. ते स्वर कानांत साठवूनच सर्व रसिक तृप्त मानाने परतात.
सवाई गंधर्व कार्यक्रमाचा उल्लेख झाला असल्याने त्याबद्दल दोन शब्द लिहिले नाहीत तर रामचंद्र गणेश कुंदगोळकर यांच्या स्मरणाच्या आठवणीने मनाला चुटपूत लागल्या शिवाय राहाणार नाही.
ज्यांच्या नावे हा महोस्तव साजरा केला जातो त्या सवाई गंधर्वांच्या स्मरणार्थ पहिला महोत्सव १९५३ सालच्या नोव्हेंबर महिन्यातील ५ तारखे पासून सूरू करण्यात आला. तेव्हा रसिकांची उपस्थिती हल्ली जेवढी मोठया संख्येने असते तेवढी नसायची. अगदी प्रारंभी पुण्यातील शनिवार पेठेतील मोतीबाग सभागृहात हा महोत्सव संपन्न होत असे. महोत्सव १९६६ साली नु.म.वि. शाळेत त्यानंतर जवळजवळ १९८८ पर्यंत सदाशिव पेठतील रेणुका स्वरूप शाळेत म्हाणजे १८ वर्षे व पुढे १९८९ पासून शनिवार पेठेतील रमणबागेतील शाळेत संपन्न होत गेला. फक्त ४६वा महोत्सव १९९८ साली गणेश कि्रडा मंदिर नेहरू स्टेडीयमवर संपन्न झाला. पावसामुळे आलेल्या व्यत्ययाने ३ वेळा ठरलेल्या तारखा बदलून पुढे ढकलाव्या लागल्या.
सवाई गंधर्व यांचा तानपुरा पुण्यातील राज केळकर संग्रहालयास १३.१२.१९८० रोजी गानहीरा हिराबाईंच्या हस्ते भेट देण्यात आला. सवाई गंधर्वांनी आयुष्यभराचा प्रत्येक श्वास गाण्यासाठी घेतला. आयुष्यात यश कीर्ती मानसन्मान मिळूनही त्याचा अंशमात्र अहंपणा डोक्यात जाऊ न देता पुढच्या पिढीला त्यांनी भरभरून गानविद्या दिली व पुढची पिढी तयार केली. श्रीमती गंगुबाई पं.फिरोज दस्तूर, पं.भीमसेन, पं.संगमेश्वर गुरव इ. मान्यवर शिष्यवर्ग नावारूपास आणला. या समस्त ख्यातनाम शिष्यांनी किराणा घराण्याची पताका देशविदेशांत फडकवत ठेवली.
सवाई गंधर्व महोत्सवाच्या यशस्वितेस सहाय्यभूत झालेले अग्रणी “आर्य संगीत प्रसारक मंडळ” या संस्थेचे सचिव एस्.व्ही.गोखले तसेच अगदी प्रारंभापासून झटणार्या मंडळाच्या अध्यक्षा स्व.हिराबाई बडोदेकर, नानासाहेब देशपांडे, (सवाई गंधर्वांचे जामात), दत्तोपंत देशपांडे गंगुबाई हनगल, पं.फिरोज दस्तूर या सारख्या अनेक मान्यवर गायक गायिकांच्या नावाचा उल्लेख कृतज्ञापूर्वक करावासा वाटतो. तसेच महोत्सवाच्या केंद्रस्थानी असलेले पं.भीमसेन जोशी अपूर्व तेजाने झ्ळकताना दिसतात हे कुणीही आनंदाने मान्य करील यात शंकाच नाही. आपल्या गानगुरूंचे इतके यथोचित स्मरण क्वचितच कुणा शिष्याने पाच दशकांवर केले असेल.
आयुष्यात शेवटच्या काही वर्षात पक्षघाताने ते विकलांग झाले तरी डोक्यात गाणं पक्कं राहिल व शिष्यांना जेवढे काही देता येईल तेवढे ते देतच राहिले. त्यांचे जावई नानासाहेब देशपांडे यांनी सुद्धा त्यांच्या गाण्याचा वारसा पुढे चालविला.
अशा या थोर गायकाने समर्थ गुरूने १२ सप्टेंबर १९५२ रोजी या इहलोकीची आपली सुरेल यात्रा संपविली.
{ लेखन व संशोधन – जगदीश पटवर्धन, वझिरा बोरिवली (प) }
अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.
हिंदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम गायक सवाई गंधर्व (12-Sep-2016)
हिंदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम गायक सवाई गंधर्व (19-Jan-2017)
हिंदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम गायक सवाई गंधर्व (19-Jan-2018)
Leave a Reply