गडकरी, रमेश शंकर

Gadkari, Ramesh Shankar

ठाणे शहरामधील अनेकांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोलाचा सहभाग होता. स्वातंत्र्यसैनिकांची संख्याही लक्षणीय होती. अशांपैकीच एक स्वातंत्र्यसैनिक म्हणजे ठाण्याच्या उथळसर विभागातील एक नागरिक कै. रमेश शंकर गडकरी होते.

शालेय जीवनापासून ते सन २००५ मध्ये काविळीने दु:खद निधन होईस्तोपर्यंत “एक वादळी व्यक्तिमत्व” अशीच त्यांची ओळख सार्‍या ठाणे शहराला होती.

१९४२ च्या लढ्यामध्ये गांधीजींच्या चले जाव – छोडो भारत तसेच असहकाराच्या चळवळीमध्ये ते सक्रीय सहभागी झाले. विविध ठिकाणची निदर्शने, निरोधने यामध्ये त्यांनी आपले योगदान दिले. हरीभाऊ दामले, रामचंद्र ऊर्फ बाळू साठे, भास्कर मोहोरीकर यांच्यासमवेत टेंभी नाक्यावरील बी.जे. हायस्कूल ही सरकारी शाळा जाळण्याच्या योजनेमध्ये ही त्यांचा सहभाग होता.

कै. नाथाजी ताम्हणे, मारूतीकुमार कोळी, रमेश चिटणीस, मोरु नाचणे, पशुपतीनाथ करोडिया यांनी आखलेल्या सुप्रसिद्ध पारसिक टनेल योजनेमध्येही ते सुरुवातीस सहभागी झाले होते. पण काही गैरसमजामधून रमेश चिटणीस व मोरू नाचणे यांच्याशी निर्माण झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी या योजनेमधून आपले अंग काढून घेतले.

उथळसर नाक्यावर बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलिस तेथील नागरिकांना उगाचच त्रास देत असत. या गोष्टीचा राग कै. रमेश गडकरी यांच्या मनात होता. तसेच निदर्शकांचा पाठलाग सायकलीवरुन करुन त्यांना पोलिस पकडत असत. ही गोष्ट गडकर्‍यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या ठिकाणच्या तीनही पोलिसांच्या सायकली पळवून नेल्या व त्यांचे पूर्णपणे डिसमॅंटलिंग करुन त्यांची विल्हेवाट लावली. या आगळिकेसाठी त्यांना अटक करण्यात आली. अर्थात पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता झाली. परंतु पुढे असहकाराच्या चळवळीत अटक होऊन त्यांना तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली.

स्वातंत्र्यानंतर त्यांनी कॉंग्रेसचे निष्ठावंत सभासद म्हणून कार्य केले. परंतु त्यांचा खरा ओढा क्रीडाक्षेत्राकडे होता. यामुळे त्यांनी मुंबई व ठाणे येथील अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाच्या माध्यामातून हुतुतू या खेळाच्या विकास प्रसारामध्ये महत्वाचे योगदान दिले. पुढे याच हुतुतू खेळाचे कबड्डी मध्ये परिवर्तन करण्यात व मुंबई व महाराष्ट्रात कबड्डी फेडरेशन या एकक्रीडा संघटनेची स्थापना करण्यात मोलाची भूमिका बजावली.

ज्ञातीकार्यामध्येही त्यांनी महत्वाचे योगदान दिले. १९७१ मध्ये ठाणे येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय चां.का.प्रभु समाजोन्नती परिषदेच्या प्रचार व निधी संकलन कार्यात त्यांनी उचललेला कार्यभाग हा विशेष उल्लेखनीय आहे.

आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्यावर कोसळलेल्या अनेक दु:खद प्रसंगांना त्यांनी अतिशय धीरोदत्तपणे तोंड दिले.

२००५ मध्ये काविळीच्या विकाराने दु:खद निधन होऊन एक धडाडीचे, जिद्दी परंतु “वादळी व्यक्तिमत्व” काळाच्या पडद्याआड गेले.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*