कथालेखक, नाटककार म्हणून रणजित देसाई यांचा परिचय असला तरी एक उत्कृष्ट दर्जाचे कादंबरी लेखक म्हणूनच महाराष्ट्राला भावलेले व्यक्तिमत्त्व. ८ एप्रिल १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड हे आहे. माध्यमिक शाळेत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. त्यांचे कथा लेखन कोल्हापूरच्या ‘महाद्वार’ मधून प्रसिद्ध होत असे. त्यांच्या ‘भैरव’ या कथेला ‘प्रसाद’ मासिकाने घेतलेल्या कथा स्पर्धेत पारितोषिक मिळाले आणि त्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या कथालेखनाला सुरुवात झाली.
‘रुपमहाल’, ‘कणव’, ‘जाणे’, ‘कातळ’, ‘गंधाली’, ‘कमोदिनी’, ‘मधुमती’, ‘मोरपंखी सावल्या’ इ. त्यांचे अनेक कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ग्रामीण आणि सामाजिक विषयावरच्या कथांमधून आलेल्या शैलीमुळे त्यांचा ठरावीक असा वाचक वर्ग तयार झाला. ग्रामीण जीवनावरील त्यांच्या कथा या एक प्रकारे चित्रकथाच होत्या. इतकी त्यांची जिवंत मांडणी होती.
‘बारी’, ‘माझं गाव’ या कादंबर्या सुरुवातीला त्यांनी लिहिल्या. त्यानंतर १९६२ साली ‘स्वामी’ ही थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी प्रसिद्ध झाली आणि तिने लोकप्रियतेचे शिखर गाठले. ‘स्वामी’ मुळे एक श्रेष्ठ लेखक म्हणून रणजित देसाईंचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यानंतर शिवाजी महाराजांवर लिहिलेली ‘श्रीमान योगी’ ही कादंबरीसुद्धा अतिशय लोकप्रिय झाली आणि त्यानंतर वाचक वर्ग रणजित देसाई यांच्या नवीन येणार्या कादंबरीची वाट पाहू लागला.
‘लक्ष्यवेध’, ‘पावनखिड’, ‘राजा रवी वर्मा’ या सर्व कादंबर्यांच्या जोडीनं विशेष गाजलेली, त्यांनी लिहिलेली आणखी एक कादंबरी कर्णाच्या जीवनावरील ‘राधेय’ ही आहे. अशा प्रकारच्या ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबर्या लिहिणे ही त्यांची हातोटीच झाली होती. रणजित देसाईंनी पुढील काळात काही नाटकंही लिहिली. ‘रामशास्त्री’, ‘स्वरसम्राट तानसेन’, ‘धन अपुरे’, ‘वारसा’, ‘स्वामी’ आणि त्यातही ‘गरुडझेप’, ‘कांचनमृग’ आणि ‘हे बंध रेशमाचे’ ही नाटकं विशेष गाजली. या व्यतिरिक्त ‘नागीण’, ‘रंगल्या रात्री अशा’ ‘सवाल माझा ऐका’ इ. चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिल्या.
१९७७ साली झालेल्या गोरेगाव येथील मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर बडोदे साहित्य संमेलनाचे १९६५ मध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविले. १९८३ मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला. अशा या ज्येष्ठ कादंबरीकाराचे ६ मार्च १९९२ रोजी निधन झाले.
Leave a Reply