राष्ट्रीय कीर्तन केसरी गोविंदस्वामी आफळे यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९१७ रोजी झाला.
गोविंदस्वामी आफळे हे नाव कानी येताच एक आगळा वेगळा विलक्षण माणूस नजरेसमोर येतो. व्यायामाने कमावलेले धिप्पाड शरीर, उंच-निंच आकृती, काळा-सावळा रंग, राकट उग्र पण तरीही रेखीव रुबाबदार चेहरा, शुभ्र धोतर सदरा, काळा कोट आणि काळी टोपी, कीर्तनाचे वेळी भगव्या रंगाचा ऐटबाज फेटा, शाल या साऱ्या व्यक्तिमत्त्वाला शोभेसा पहाडी खडा आवाज !
सिनेमा, रेडीओ, टी.व्ही. अश्या विविध माध्यमांमुळे कीर्तन हा प्रकार थोडा मागे पडू लागला होता. त्यात आफळे बुवांनी नवचैतन्य निर्माण केले. क्षणात हास्याचा खळखळाट तर क्षणात वीरश्री, गहिवर दाटेल असा करूण रस तर मिश्कील कोट्या अशाप्रकारे नवरसांचा उत्कट अविष्कार त्यांच्या कीर्तनातून होत असे.
त्यांनी ११ चित्रपटांतून कामे केली, अनेक नाटकांतून काम केले. प्रभात चित्रपट संस्थेत “शेजारी” चित्रपटात ‘नईम’ची भूमिका त्यांना मिळाली होती पण आईने त्यांना त्या क्षेत्रातून बाहेर खेचले. हातात चिपळी दिली आणि “नभी जैसी तारांगणे तैसे लोक तुझ्या कीर्तनाला येतील” ह्या आशीर्वादासह कीर्तन करण्याची आज्ञा दिली.
संपूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरची असंख्य गावं इतकच नव्हे तर अमेरिकेतही ते ३ महिने राहून कीर्तने गाजवून आले.
गोविंदस्वामी आफळे यांचे १ नोव्हेंबर १९८८ रोजी निधन झाले.
Leave a Reply