कोल्हापूर हे नाव यापूर्वी कुस्ती परंपरेशी जोडलेले. गेल्या दहाएक वर्षांत काही युवा खेळांडूनी या लुप्त होत चाललेल्या परंपरेला पुन्हा सोनेरी झळाळी देण्याचे काम आपल्या शिरावर घेतले.त्यातलाच एक खेळ म्हणजे बुध्दीबळ… बुद्धिबळाच्या या खेळात अल्पावधीतच उत्तुंग झेप घेणाऱ्या ऋचा पुजारी या युवा खेळाडूचा मोठा वाटा आहे. २१ मे २०११ फिलिपाईन्समध्ये झालेल्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत तिने आपल्या प्रतिस्पध्र्यावर लीलया मात करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत भारताने मिळविलेल्या एकूण १८ पदकांत महाराष्ट्राच्या वाटय़ाला आलेले तिचे एकमेव पदक होते. म्हणूनच या मराठमोळ्या सुवर्णकन्येचे खास अभिनंदन केले पाहिजे. तिच्या कुटुंबीयांनी वयाच्या सहाव्या वर्षी छंद म्हणून बुद्धिबळाचा पट आणि सोंगटय़ा तिच्या हातात दिल्या आणि सहा महिन्यांच्या छोटय़ा प्रशिक्षणातच तिने आपल्या चाणाक्ष बुद्धीची आठवण करून दिली. सात वर्षे वयोगटातील पहिल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या ऋचाने पाठोपाठ चेन्नई येथे राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतही आपले स्थान कायम राखले आणि मग कधी मागे वळून पाहिले नाही. स्थानिक प्रशिक्षक भरत चौगुले यांच्याकडे बुद्धिबळाचे धडे गिरविणाऱ्या ऋचाने तिच्या खेळासाठी घेतलेली मेहनत या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नव्या खेळाडूंना खरेतर एक आदर्श अशी पाऊलवाट आहे. तिच्या प्रशिक्षकांनी वेळीच तिचे गुण हेरून तिला द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले यांच्याकडे सुपूर्द केले. या दोन शिक्षकांचे मार्गदर्शन आणि अफाट मेहनतीच्या जोरावर ऋचाने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा अनेक स्पर्धामध्ये पदकांची एक रास उभी केली आहे. ऋचाने संपादन केलेल्या सुवर्णपदकामुळे पुढील वर्षी श्रीलंका येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी आणि स्लोव्हेनिया येथे होणाऱ्या जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेसाठी तिची थेट निवड झाली आहे. या सुवर्णपदकाने ऋचाचा इंटरनॅशनल मास्टर या किताबाकडे प्रवास सुरू झाला. सध्या जागतिक रेटिंगमध्ये २१५० गुण मिळविणाऱ्या ऋचाला हा टप्पा ओलांडून ग्रँडमास्टर या किताबाला गवसणी घालायची आहे.
Leave a Reply