ज्येष्ठ कथाकार, साहित्यिक शंकर नारायण ऊर्फ शं.ना. नवरे यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२७ रोजी मुंबईत झाला.
कथाकार तसेच नाटककार म्हणून `शन्ना’ या नावाने ते महाराष्ट्राला सुपरिचित होते.
त्यांचे प्राथमिक शिक्षण डोंबिवलीतील शाळेत तर माध्यमिक शिक्षण डोबिवलीच्या इंग्लिश स्कूलमध्ये आणि दादरच्या किग जॉर्ज शाळेत झाले. १९४५ साली शालांत परीक्षा पास झाल्यावर त्यांनी सेंट झेव्हीयर्स मुंबई, फर्ग्युसन, पुणे आणि सिद्धार्थ कॉलेज मुंबई इत्यादी महाविद्यालयातून शिक्षण घेतले व १९४९ साली बी. एस्सी.ची पदवी मिळविली.
त्यांचे सुरुवातीचे लेखन विविध वृत्तपत्रात आणि साप्ताहिकातून प्रसिद्ध झाले. त्यांनी शन्नाडे या नावाने वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले.
कथाकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या शन्नांचे सत्तावीस कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांचे ‘कवडसे’, ‘शन्नाडे’, ‘झोपाळा’, ‘उनसावली’, ‘झोका हे ललित लेखसंग्रह अतिशय गाजलेले आहेत. त्यांनी काही अनुवादही केले. ‘आगबोटीची कुळकथा’, ‘असे विख्यात संशोधक… असे त्यांचे शोध’ ही त्यांची पुस्तके उल्लेखनीय ठरली.
शन्नांची ‘धुक्यात हरवली वाट’, ‘सुरुंग’, ‘धुम्मस’, ‘सूर राहू दे’, ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय’ ही नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. याशिवाय एक असतो राजा, नवरा म्हणू नये आपला, गुलाम, हवा अंधारा कवडसा, वर्षाव, रंगसावल्या इत्यादी अनेक नाटके त्यांनी लिहिली.
त्यांच्या ‘वारा’, ‘झोपाळा’, ‘मेणाचे पुतळे’, ‘शहाणी सकाळ’ हे कथासंग्रह आणि ‘निवडुंग आणि इंद्रायणी’, ‘संवाद’, ‘सुरुंग’ या कादंब-याही खूप गाजल्या.
मानवी व्यवहारातील नाट्यमय क्षण उचलून त्यावर केलेले त्यांचे लेखन, खुसखुशीत शैलीतील प्रवाही पण उथळ नसलेले लेखन ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये.
बुधवार दि. २५ सप्टेंबर २०१३ रोजी पहाटे, वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे डोंबिवलीमधील लाईफलाईन या खासगी रुग्णालयात निधन झाले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. (28-Nov-2017)
लेखक, नाटककार व पटकथाकार शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना (21-Nov-2018)
Leave a Reply