पट्टेकर, संत गजानन महाराज

Sant Gajanan Maharaj Pattekar

Gajanan Maharaj Pattekar

जन्म : धनत्रयोदशी – दिवाळी इ.स. १९११ (शहापूर)
मृत्यू : १ नोव्हेंबर १९९१ (ठाणे)

 श्री गजानन महाराज पट्टेकर ह्यांचे मूळ आडनाव गुप्ते. त्यांच्या पूर्वजांकडे श्री शिवरायाच्या काळात महाराष्ट्रांतील नाशिक, नगर, ठाणे ह्या सरहद्दीवरील किल्ला “पट्टा”, त्याच्या आसपासचा औंढा पट्टा या परिसराचे अधिपत्य होते. तेव्हांपासून पट्टेकर हे आडनाव प्रचलित झाले.
महाराजांचे वडील केशवराव बाळकृष्ण पट्टेकर हे शहापूर, जि. ठाणे येथे मामलेदार होते. त्याच ठिकाणी महाराजांचा जन्म झाला. महाराजांच्या आई अत्यंत कडक उपासना करणार्‍या होत्या. पाच वर्षे सोळा सोमवारचे व्रत त्यांनी केले आणि उद्यापनाच्या दिवशी प्रत्यक्ष विघ्नहर्त्या गजाननाने दर्शन देऊन “तुम्हास पुत्र रत्न होईल”, असे आश्वासन दिले. आणि तदनंतर महाराजांचा जन्म झाला.

लहानपणी शालेय शिक्षण सुरू असतानाच महाराज गावाबाहेरील मारुतिरायाच्या मंदिरात जाऊन तहान भूक विसरून नामस्मरण करीत बसत. त्यांना अजिबात भिती वाटत नसे.

१९३५-३६ या काळात श्री.पी.बाळू व कै. नामदार बाळासाहेब खेर, मुख्यमंत्री, यांच्याबरोबर पूज्य महाराजांनी हरिजन उद्धाराचे कार्य केले. १९३७ साली डॉ. राजेंद्रप्रसाद भिवंडीस आले असता महाराजांनी त्यांची भेट घेऊन निवडणुका व हरिजनांच्या अडचणी ह्यांची त्यांना स्पष्ट कल्पना दिली. १९५० साली श्री. धोंडू लोखंडे यांनी पुढाकार घेऊन हरिजनांतर्फे ना. गोविंदराव वर्तक, यांच्या अध्यक्षतेखाली कामाठीपुरा येथे महाराजांचा सत्कार घडवून आणला. त्याच वर्षी मुलुंड येथील कीर्तनात संत गाडगे महाराजांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या सेवाकार्याचा गौरव केला.

श्री क्षेत्र गाणगापूर येथे महाराज गेले असता, अक्कलकोट येथे त्यांना वठलेला मंदारवृक्ष दाखवला. ह्या वृक्षाला पानेफुले येत नाहीत असे भक्तांनी सांगितले. महाराजांनी त्याच वृक्षाखाली २ फूट खणताच, ऊर्ध्व सोंडेची गणपतीची मूर्ती आढळून आली. तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

श्री नानामहाराज श्रीगोंदेकर, जि. नगर, यांच्या पुण्यतिथीला ११ व १२ ऑगस्ट १९६९ रोजी महाराजांनी स्वत: राहून उत्सव साजरा केला.

श्री पूज्य महाराज संत राममारुती महाराजांचे भक्त होते. त्यांच्या प्रयत्नाने संत राममारुती महाराजांची तैलचित्रे अनेक कायस्थ प्रभू संस्थांत लावली गेली आहेत. संत राममारुती महाराजांनी आपल्या उभ्या आयुष्यात आपल्या मुखावटे भगवंतांच्या नामाशिवाय अन्य एकही शब्द काढला नाही. त्यांच्या चरित्रापासून आपण नामस्मरण करण्याची स्फूर्ती घेतली पाहिजे.

संत राममारुती महाराजांची समाधी कल्याण येथे आहे. त्या ठिकाणी महाराजांच्या प्रेरणेने ज्ञातिबांधवांनी सभामंडप बांधला. उत्सवाच्या आठवड्यात पूज्य महाराजांचा मुक्काम तिथेच असे.

श्री. वज्रेश्वरी देवीचे मूळ स्थान कोकणातील कुडूसजवळील गुंजकाटी या गावचे. तेथील मूर्ती भंगल्याकारणाने एका देवीभक्ताने श्री वज्रेश्वरी व श्री रेणुका यांच्या नवीन मूर्ती तयार करून दिल्या. १४-३-७० ला संस्थानचे चेअरमन श्री. नानासाहेब खळे वकील व त्यांच्या पत्नी सौ. सुलभाताई या उभयतांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.

कडापे येथील देवीच्या मंदिराजवळ पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. पूज्य महाराजांनी त्या ठिकाणी विहीर खोदण्यास जागा दाखविली व संस्थानच्या आर्थिक साहाय्यासाठी आवाहन करून निधीत भर टाकली.

पू. महाराज नोकरीनिमित्त दुसर्‍या महायुद्धात आर्मी इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून काम करत होते. अनेक लहान मोठ्या सैनिक अधिकार्‍यांबरोबर त्यांनी काम केले आहे.

पूज्य महाराज ब्रह्मचारी होते. निर्व्यसनी, निरपेक्ष वृत्ती व साधी राहणी ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती. परमेश्वराच्या नामस्मरणानेच सारी दु:खे, चिंता नाहीशा होतात. कोणत्याही साधूच्या किंवा बुवाच्या भजनी न लागता ईश्वराचे श्रद्धापूर्वक नामस्मरण करा ही त्यांची शिकवण आहे. नितळ अंगकांती, तांबूस गौरवर्ण, भव्य भालप्रदेश, सतेज आकर्षक नेत्र अशी दिव्य देवी संपदा लाभलेली श्री गुरुदेव महाराजांची मूर्ती एक धवल धोतर, अर्ध्या बाह्यांचा श्वेत शर्ट, ह्या अत्यंत साध्या वेषात सदा शोभायमान दिसवयाची. प्रत्येक गुरुपौर्णिमेला त्यांच्या दर्शनासाठी हजारो भक्तांची अक्षरश: रीघ लागलेली असे.

१ नोव्हेंबर १९९१ रोजी ठाणे येथे गुरुमहाराजांचे महानिर्वाण झाले.

 

1 Comment on पट्टेकर, संत गजानन महाराज

  1. I want to know, where is Shahapur, the place, at which Sukumar tree is there by the side of river. At which Sri Hemadpant, kept his Saisatcharita, and worshipped the book.

Leave a Reply

Your email address will not be published.


*