प्रसिद्ध नवनाथांपैकी एक असलेले संत निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ आणि गुरु होते. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली.
ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता-पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला. निवृत्तिनाथांनीच ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.
सुमारे चारशे योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तिपर असे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना निवृत्तिनाथांनी केली आहे. निवृत्तिदेवी, निवृत्तिसार आणि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृत्तिनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. धुळ्याच्या श्रीसमर्थवाग्देवतामंदिरात ‘सटीक भगवद्गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेवली आहेत.
ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्त झाल्यानंतर मुक्ताई अन्नपाणी त्यागून परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरला देह ठेवला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आलेली आहे.
Leave a Reply