रावसाहेब, रावबहादुर, पद्मभूषण (१९५७), पुणे विद्यापीठाची डी. लिट. पदवी इत्यादी अनेक मान-सन्मान ज्यांना लाभले ते गोविद सखाराम सरदेसाई म्हणजेच ‘रियासतकार सरदेसाई’ यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील गोविल या गावी १७ मे १८६५ साली झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण शिपोशीत या गावी तर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण रत्नागिरीत झाले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये १८८८ मध्ये त्यांनी बी. ए. ची पदवी प्राप्त केली. १८८९ ते १९२५ या काळात बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या काळी ‘रिडर’ म्हणून आणि युवराजांचे ‘ट्यूटर’ म्हणून त्यांनी काम पाहिले. या कामासाठी वेळोवेळी काढलेल्या टिपणातून ‘रियासतीं’चा जन्म झाला. १८९८ मध्ये त्यांनी मुसलमानी रियासत प्रसिद्ध केली. हिदुस्थानचा अर्वाचीन इतिहास, मराठी रियासत आणि ब्रिटिश रियासत असा १००० ते १८५८ पर्यंतचा सर्व इतिहास अभ्यासून लिहून काढल्यामुळे ते ‘रियासतर सरदेसाई’ म्हणून ओळखले जाऊ लागले. सयाजीराव गायकवाड महाराजांबरोबर त्यांनी संपूर्ण भारत, युरोप आणि इंग्लंडचा अनेकवेळा प्रवास केला. त्यातून जगातील लोकरिती, समाज, इतिहास, स्थानिक परंपरा आणि मानवी स्वभावाचा सखोल अभ्यास त्यांना करता आला. आधीच बुद्धिमान, शिस्तप्रिय व अचूक विचार असल्यामुळे त्यात प्रगल्भता आली. स्वभावातील चिकाटी, अथक परिश्रम करायची तयारी आणि इतिहासाभ्यासाची आवड या सर्व तपश्चर्येतून आणि इतिहासाच्या समग्र आणि साधार लेखनातून रियासती लिहिण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडले. ‘न्यू हिस्ट्री ऑफ मराठाज्’, ‘मेन करंन्स ऑफ मराठा हिस्ट्री’, ‘पेशवे दप्तर’, ‘पुना रेसिडेन्सी कॉरसस्पॉन्डस्’ असे संशोधित आणि संपादित एकंदर एकशेपाच ग्रंथ आणि २७५ लेख त्यांनी लिहिले आहेत. वयाच्या ९४ व्या वर्षी निधन होईपर्यंत ते सतत कार्यमग्न होते.
२९ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांना देवाज्ञा झाली.
## Sardesai Riyatsarkar
Leave a Reply