प्रधान, सतिश

Pradhan, Satish

ठाण्याचे माजी महापौर पुढे अनेक महत्त्वाच्या पदांवर आणि खासदार असा सतिश प्रधान यांचा आजवरचा राजकीय प्रवास झाला आहे. १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना झाल्यापासून सतिश प्रधान संघटनेत सक्रिय होते. १९६७ साली ठाण्यात भगवा फडकल्यानंतर नगराध्यक्षपदावर वसंतराव मराठे यांची निवड झाली. पण काही कारणास्तव मराठे पक्षापासून बाजूला झाल्यानंतर प्रधानांची वर्णी नगराध्यक्षपदावर झाली. त्याच काळात संघटना बळकड व संपूर्ण जिल्ह्यात रुजविण्यासाठी प्रधानांनी प्रचंड मेहनत घेतली. तलासरी, जव्हार, मोखाडा या भागातल्या कम्युनिस्टांशी शिवसेनेने अनेकदा दोन हात केले. पूर्वी राज्य सरकारचे सर्व जीआर इंग्रजीतून पाठविले जात. १९७४ साली प्रधानांनी या इंग्रजी जीआरला कडाडून विरोध करत ते मराठीत पाठवा नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा सरकारला दिला. त्यानंतर नमलेल्या राज्य सरकारने मराठीत जीआर काढण्यास सुरवात केली. १९८२ साली ठाणे महापालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रधान ठाण्याचे पहिले महापौर झाले. त्या दिवसापासून या जिल्ह्याच्या सांस्कृतिक पालटाला खर्‍या अर्थाने सुरूवात झाली. प्रत्येक गोष्टीचे प्रगतीशील परिवर्तन करणे हा त्यांचा खाक्या होता. सतिश प्रधानांनी ठाण्याला नवे बदल स्वीकारण्यास प्रवृत्त केले होते व त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशस्त वास्तूंची निर्मिती झाली. गडकरी रंगायतन व दादोजी कोंडदेव क्रीडा सभागृह ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत. सांस्कृतिक विकासाद्वारेच त्यांनी लहान मुलांवर मैदानी संस्कार करण्याच्या हेतुने, ठाणे मॅरॅथॉन स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. विधानसभेच्या निवडणूकीत पराभव पदरी पडल्यानंतर शिवसेनेने त्यांना दोन वेळा राज्यसभेवर पाठविले होते.

२००४ विधानसभा निवडणुकीत आमदारकीची निवडणुक न लढऊ दिल्यामुळे, प्रधानांनी शिवसेनेला कायम जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये ही मान मिळेनासा झाल्याने प्रधानांनी मनसेची वाट धरली.

या पक्षातले सर्वात जेष्ठ नेता असल्याने राज त्यांना मानाने वागवत होते. परंतु, पुन्हा विधानसभा निवडणूक लढविण्याच्या आशेने त्यांचा घात केला. राजन राजेंना तिकिट मिळाल्याने नाराज झालेल्या प्रधानांनी मनसेलाही सोडचिठ्ठी दिली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*