सिंग, (डॉ.) सत्यपाल

एमएस्सी., एम फिल, पीएचडी, एमबीए अशा पदव्या संपादन केलेले, साहित्य, काव्यात रमणारे असे पोलीस अधिकारी म्हणजे डॉ. सत्यपाल सिंग. महाराष्ट्र केडरचे पोलिस अधिकारी असल्यामुळे आणि महाराष्ट्रातच बराच मोठा काळ वास्तव्याला असल्यामुळे त्यांची गणना मराठीजनातच केली पाहिजे.

वडिलांची इच्छा म्हणून ते आयपीएस अधिकारी झाले अन्यथा ते शास्त्रज्ञ झाले असते. त्यांनी अमेरिकन विद्यापीठात अर्जही केले होते. दोन विद्यापीठांनी त्यांना फेलोशिपही देऊ केली होती. परंतु वडिलांच्या नकारामुळे त्यांनी ती नाकारली.लहानपणापासून हुशार विद्यार्थी म्हणून गणल्या गेलेल्या डॉ. सिंग यांनी अगदी एमएस्सी होईपर्यंत पहिला क्रमांक कधीही सोडला नाही. नागपूर विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासन या विषयावर पीएचडी करताना ते सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले.
उद्योग मंत्रालयात नियुक्ती झाली तेव्हा उद्योगाची माहिती व्हावी यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियात जाऊन एमबीए केले.
विद्यार्थीदशेपासूनच अध्यात्माचे वेड असलेल्या डॉ. सिंह यांनी असतानाच वेदाभ्यास करून त्यावर भाषणही दिले होते. त्यांच्या स्वतंत्र ब्लॉगवरील वेद, योगा यावरील लेखन त्यांच्या व्यासंगाची साक्ष देतात. वेदातील वैज्ञानिक सौंदर्य हा त्यांचा खास अभ्यासविषय! यावर त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत.
१९८० च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले डॉ. सिंग यांनी ठाणे, नाशिक, बुलढाणा, गडचिरोलीचे अधीक्षक, मुंबईत वांद्रे परिमंडळाचे उपायुक्त, ईशान्य मुंबईत अतिरिक्त आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त, पुण्याचे आयुक्त आणि राज्याचे अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अशा विविधांगी जबाबदारी पार पाडल्या आहेत. डॉ. सिंग हे काही काळ केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातही होते.
प्रत्येक ठिकाणी आपली वेगळी छाप पाडणारे डॉ. सिंग हे पुण्याचे आयुक्त असताना माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पासपोर्ट नूतनीकरण
रोखल्याने अडचणीत आले होते. बागवे यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट करून पोलीस अहवाल देण्यास त्यांनी नकार दिला होता.
मुंबईचे आयुक्त व्हावे ही इच्छा अपूर्ण राहणार असे वाटत असतानाच अचानकपणे ऑगस्ट २०१२ मध्ये मुंबईच्या आयुक्तपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली.
(संदर्भ – लोकसत्ता – व्यक्तिवेध)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*