सावित्रीबाई फुले

Phule, Savitribai

उपेक्षित स्त्रियांचे शिक्षण व स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार आणि अनिष्ठ रूढी विरोधात अखंड संघर्ष करणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक, दलितांचे उद्धारक व सत्यशोधक समाजाचे नेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्या धर्मपत्नी. १८४० साली त्यांच्या वयाच्या ८ व्या वर्षीच त्यांचा ज्योतिबांशी विवाह झाला.

ज्योतिबा मिशनर्‍यांच्या शाळेत इंग्रजी शिकले होते. शिक्षणामुळे झालेल्या जागृतीने समाजातील तीव्र विषमतेचे प्रखर भान येऊन त्यांनी आपले जीवन तळागाळातील जनतेचे शैक्षणिक परिवर्तन व त्यांचा सामाजिक पातळीवर उद्धार करण्यासाठी खर्ची घालायचे ठरवले.

पत्नी या नात्याने सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबरीने समाजसेवेचा वसा घेतला. त्या काळात मुलींच्या शिक्षणाला फारशी किमत नव्हती. समाजातील उच्चवर्णात गणल्या जाणार्‍यांच्यातही स्त्री शिक्षणाविषयी अनास्थाच होती. अशाप्रकारे सर्वसाधारण समाजाची स्थिती मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत वाईटच होती. त्यामुळे फुले पतीपत्नीनी मुलींच्या शाळा काढण्याचे व चालवण्याचे व्रतच घेतले.

मुलींनी शिकावे म्हणून त्यांनी शाळा सुरू केल्या. त्यांच्या या सुधारणेच्या कामावर त्यांच्या कुटुंबाची वाईट प्रतिक्रिया येऊन त्यांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते. समाजानेसुद्धा त्यांच्या या पुरोगामीपणाकरता त्यांचा अतिशय छळ केला. पण कोणत्याही अडचणींनी या दांपत्याला त्यांच्या ध्येयापासून विचलित केले नाही. ज्योतिबांना शिक्षण कार्यात सहकार्य करण्यासाठी सावित्रीबाई स्वतः प्रथम शिकल्या. त्यांनी अध्यापन कसे करावे याचेही धडे घेतले. त्यानंतर त्या शाळांचे व्यवस्थापन आणि अध्यापन दोन्हीही करू लागल्या.

स्त्री शिक्षणाचे कार्य त्यांनी नेटाने आणि ध्येयाने खूपच पुढे नेले. त्यांनी कामगारांसाठी रात्रशाळा काढल्या व तेथेही अध्यापन केले. तसेच देवदासीची पद्धत बंद करणे, बालविवाहाला बंदी करणे, केशवपनाची पद्धत बंद करणे, विधवा विवाहाला असलेल्या बंदीबद्दल सामाजिक जागृती करणे इ. विषयांवर सामाजिक जागृती त्यांनी केली. या गोष्टी समाजातून समूळ नष्ट व्हाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पुढील काळात जेव्हा स्त्रियांसाठी सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी दरवाजे खुले होत गेले तेव्हा सावित्रीबाईंच्या या क्षेत्रातील कार्याचे महत्त्व समाजाच्या लक्षात आले. सावित्रीबाईंनी दर्जेदार काव्य लेखन केले आहे.

त्यांचा ‘काव्यफुले’ हा कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. १८९७ च्या प्लेगच्या साथीत त्यांनी रुग्णांची सेवा केली. त्यात त्यांना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ ला त्यांनी देह ठेवला.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*