जन्म- १० मार्च, १८६३
मृत्यू- ६ फेब्रुवारी, १९३९
तिसरे महाराजा सयाजीराव गायकवाड हे १८७५ ते १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे राजे होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
महाराजा सयाजीराव गायकवाड या नावाने ओळखले जाणारे प्रजाहितदक्ष, आदर्श असे नरेश. पूर्वाश्रमीचे ते गोपाळ काशीराम गायकवाड. अतिशय गरीब घरातला एक हुशार, चुणचुणीत मुलगा.
१० मार्च १८६३ रोजी नाशिक जिल्ह्यातील कवणाणे येथे त्यांचा जन्म झाला. कोणालाही सांगून खरे वाटले नसते पण अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेला गोपाळ पुढे बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यू नंतर बडोद्याच्या राजघराण्यात दत्तक म्हणून गेला आणि बडोद्याच्या राजगादीवर एक महाराजा म्हणून सिहासनावर आरूढ झाला. नसता आरूढ झाला नाही तर ‘हिदुस्थानातील एकमेव आदर्श राजा’ हा किताबही पंडित मदनमोहन मालवीय यांच्याकडून त्यांनी मिळवला. सयाजीराव महाराजांनी आपल्या छोट्याशा संस्थानात अनेक सुधारणा घडवून आणल्या. न्यायव्यवस्था, ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण, हरिजनांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण, संस्कृत ग्रंथ प्रकाशन, कला शिक्षणाची सोय, सर्वसामान्य माणसांसाठी अशा कितीतरी सुधारणा त्यांनी प्रत्यक्षात आणल्या. या व्यतिरिक्त स्त्रियांच्या बाबतीतही पुढाकार घेऊन त्यांचे हक्क त्यांना मिळावेत म्हणून खूपच प्रयत्न केले. बालविवाह बंदी, स्त्रियांना वारसाहक्क, विधवा विवाह, कन्याविक्रय बंदी, पडदा पद्धती बंद इ. सुधारणा आपल्या संस्थानात करून स्त्रियांना आधुनिक युगाचे दालन उघडून दिले. अत्यंत पुरोगामी विचाराच्या या महाराजाने राष्ट्रीय, सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले. १८८६ मध्ये मुंबई येथील एका समारंभात उत्स्फूर्तपणे त्यांनी ज्योतिबा फुल्यांना ‘महात्मा’ ही पदवी दिली. तसेच डॉ. आंबेडकरांना शिष्यवृत्ती आणि नोकरीही दिली होती. अशा या आदर्श राजाचे ६ फेब्रुवारी १९३९ रोजी निधन झाले.
## Sayajirao Gaikwad
Leave a Reply