ज्येष्ठ व सुप्रसिद्ध गायिका डॉ. आशालता करलगीकर यांचा जन्म २० नोव्हेंबर १९४२ रोजी वैजापूर (जि. औरंगाबाद) येथे झाला. देशभरात शास्त्रीय गायनाचे त्यांनी दोन हजार कार्यक्रम केले. तेलुगू आणि हिंदी चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले. मात्र, शास्त्रीय संगीताच्या मैफलीत त्या अधिक रमल्या.
पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नीलम संजीव रेड्डी, लता मंगेशकर, मोहमद रफी आदी मान्यवरांसमोर त्यांनी आपली कला सादर करून प्रशंसा मिळविली होती. १९६३ साली अफगानिस्तान मधील काबूल येथे पं. भीमसेन जोशी, पं. सामताप्रसाद, ज्येष्ठ नृत्यांगना इंद्राणी रहमान अशा नामांकित कलाकारांबरोबर त्यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला. भक्तीरसात ओथंबलेले गायन ऐकून राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आशालता यांना आंध्रलता म्हटले. हीच उपाधी पुढे त्यांची ओळख झाली.
आशालता यांचे शास्त्रीय आणि सुगम गायकीवर प्रभूत्व होते. मराठवाड्यातील नवीन पिढीतील गायकांना आशालता यांनी नेहमीच मार्गदर्शन केले.
त्यांच्या आवाजातला ‘चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे’ हा एकनाथ महाराजांचा मराठी कूट अभंग प्रसिद्ध आहे. प्रत्येक मैफलीत हा अभंग त्या नेहमी गात.
आशालता करलगीकर यांना सूरमणी, सुरश्री असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. भारतात संगीत क्षेत्रात अखिल ३ राष्ट्रीय पुरस्कारांच्या मानकरी असलेल्या त्या पहिल्या गायिका होत्या.
डॉ. आशालता करलगीकर यांचे २९ डिसेंबर २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply