संतती नियमनाच्या प्रचारकार्यात उघडपणे स्वत:ला झोकून देणाय्रा शकुंतलाबाई परांजपे या देशातल्या पहिल्या महिला कार्यकर्त्या. शकुंतलाबाई यांचा जन्म पुण्यात १७ जानेवारी १९०६ रोजी झाला. फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्याचे रॅंग्लर परांजपे यांच्या त्या एकुलत्या एक कन्या. विवेकबुध्दीला पटतं ते बिनदिक्कत करावं, ही त्यांच्या घरातली शिकवण होती. त्यांच प्राथमिक शिक्षण घरीच झालं. माध्यमिक शिक्षण पुण्याच्या हुजुरपागा शाळेत व नंतर फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला मात्र वडिलांप्रमाणे रॅंग्लर श्रेणी त्या मिळवू शकल्या नाहीत.
केंब्रिजमधील शिक्षण पूर्ण झाल्यावर जिनेव्हातील इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यासंस्थेत नोकरी करत असतांना तिथे युरा स्लेप्टझॉफ या रशियन चित्रकाराशी त्यांचा स्नेह जुळला. त्याच्याशी शकुंतलाबाईंनी १९३४ मध्ये विवाह केला. त्यांना १९३६ मध्ये कन्या झाली. तीच आजची सुप्रसिध्द लेखिका,दिग्दर्शिका सई परांजपे. नंतर शकुंतलाबाईंनी घटस्फोट घेतला व त्या मुलीसह भारतात परतल्या. नंतर वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली व काही लेखनही केले.त्यांनी काही चित्रपटांतून कामही केले आहे.
शकुंतलाबाई परांजपे यांचे महत्वाचं सामाजिक योगदान लक्षात घेऊन शकुंतलाबाईंची विधान परिषदेवर १९५८ मध्ये ६ वर्षांसाठी नेमणूक केली. नंतर १९६४ ते १९७० अशी सहा वर्ष त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणुन नेमणूक करण्यात आली. राज्य शासनाला कुटुंब नियोजनासाठी जे अर्थसहाय्य केंद्राकडून मिळतं, त्याच्यात त्यांनी सुधारणा घडवल्या. त्या मौलिक कामगिरीसाठी शकुंतलाबाईंचा पद्मविभूषण हा किताब १९९१ मध्ये देऊन गौरव केला.
अतिशय करारी व्यक्तिमत्त्व, कथाकार, कादंबरीकार आणि आधुनिक विचारांच्या अशा शकुंतलाबाई परांजपे म्हणजे महाराष्ट्राला भूषण असलेले एक स्त्री व्यक्तिमत्व. रँग्लर रघुनाथ परांजपे यांच्या त्या कन्या. प्राथमिक शिक्षण घरीच झालं पण त्यांचे माध्यमिक शिक्षण मात्र पुण्याच्या हुजूरपागा हायस्कूलमध्ये झालं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी बी. एस. सी. केलं. १९२९ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी एम. ए. ची पदवी मिळवली. वडिलांच्या घरातल्या वातवरणामुळे आणि त्यांचे सख्खे नातेवाईक असलेले महर्षी कर्वे यांच्या घरातील कुटुंबीयांच्या संस्कारांमुळे, प्रेरणेमुळे त्यांच्यात समाजकार्याची आवड निर्माण झाली. श्रीमती इरावती कर्वे आणि रघुनाथ धोंडो कर्वे यांच्याबरोबर त्यांनी पुणे म्युन्सिपालटीच्या दवाखान्यातून अनेक वर्षे सेवाकार्य केलं. त्या काळात समाज मनात संतती नियमनाबद्दल फारशी जागृती नव्हती. अशा वेळेस संतती नियमनाच्या प्रचाराचे कार्य शकुंतलाबाई परांजपे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन नेटाने केले. या सर्व विषयावर ‘‘समाज स्वास्थ्य’’ या मासिकातून त्यांनी विपुल लेखन केले. शकुंतलाबाईंच्या सर्व कार्याचा गौरव करण्यासाठी राज्यसभेच्या सदस्या म्हणून १९६४ ते १९७० या काळात त्यांची नेमणूक झाली. १९९१ साली ‘‘पद्मविभूषण’’ या सन्माननीय पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
शकुंतलाबाईंनी ठरावीक पण वैशिष्ट्यपूर्ण लेखन केले आहे. ‘घरचा मालक’ ही कादंबरी, ‘संगीत पांघरलेली कातडी’, ‘सोयरीक व लागेबांधे’ ही फ्रेंच नाटकांची रूपांतरे ‘काही आंबट काही गोड’, ‘भिल्लीणीची बोरे’, ‘माझी प्रेतयात्रा’ असे कथात्मक ललित लेखनही त्यांनी केले. ‘पाळणा लांबवायचा की थांबवायचा’ हे कुटुंबनियोजन विषयक पुस्तकही त्यांनी लिहिले. त्यांचे लिखाण हे खुसखुशीत नर्म विनोदी शैलीतील तसे जीवनाकडे मिश्किलपणे पहाण्याचा दृष्टिकोन देणारे होते. त्यामुळे त्यांचे लेखन आजही लोकप्रिय आहे. मराठी भाषा शुध्द ठेवावी व इंग्रजी शब्दांची हकालपट्टी करावी हा विचार त्यांनी कृतीत आणला.
३ मे २००० रोजी पुण्यातील त्यांचे निधन झाले. इतर कोणाची पर्वा न करता स्वत:च्या बुध्दीला पटेल तेच काम सर्वस्व झोकुन करणार्या आणि कृतीशील लेखिकेचं आयुष्य जगलेल्या शकुंतलाबाईंना विनम्र प्रणाम! अशा या विद्वान महाराष्ट्र कन्येला ३ मे २००० रोजी पुणे येथे देवाज्ञा झाली.
Leave a Reply