गांधीवादीचे भाष्यकार व लोकशक्ती (वृत्तपत्र) आणि साधना साप्ताहिकाचे माजी संपादक
महाराष्ट्राची तरुण पिढी १९२० ते १९५०-५५ पर्यंत ज्यांनी वैचारिकदृष्ट्या घडविली, बुद्धिवादाचे आणि त्याचबरोबर नैतिकतेचे संस्कार ज्यांनी तिच्यावर केले, आणि तिला ध्येयप्रवण बनविले अशा विचारवंतांमध्ये आचार्य शं.द. जावडेकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्वसमाजवादी नेते, कार्यकर्ते त्याचप्रमाणे राष्ट्रसेवा दलाचे हजारो सैनिक जावडेकर यांच्या वैचारिक शिदोरीवर पोसले गेले.
दैनिक लोकशक्तीचे संपादक, साधना साप्ताहिकाचे संपादक अशा विविध जबाबदार्या पार पाडत असतानाच जावडेकर यांनी “आधुनिक भारत”, “लोकशाही”. “गांधीवाद”, “लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी”, “गांधीवाद”, “समाजवाद”, “जवाहरलाल नेहरु”, “हिंदू-मुसलमान ऐक्य” अशी विविध महत्वपूर्ण पुस्तकेही लिहिली. “आधुनिक भारत” या पुस्तकात जावडेकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची अतिशय मूलगामी चिकित्सा केली आहे. त्यामुळे मराठीतील तत्वज्ञ कादंबरीकार वामन मल्हार जोशी यांनी “गीतारहस्यानंतरचा थोर ग्रंथ” असे त्याचे वर्णन केले आहे. जावडेकर हे आगरकर, टिळक आणि गांधी या तिघांनाही गुरू मानत. (त्यात पुढे मार्क्सची भर पडली.) या सर्व द्रष्ट्या नेत्यांचे विचार कोणत्याही प्रकारचे किल्मिष येऊ न देता, त्यातील देशाला व समाजाला उपयुक्त व अनुकरणीय असेल असा भाग जावडेकर यांनी साक्षेपाने महाराष्ट्रीय जनतेसमोर मांडण्याचे काम केले, त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन केले. त्यामुळे तत्कालीन महाराष्ट्रातील बुद्धिवंत त्यांच्या लेखनाकडे आकर्षित झाले.
लोकशाही, समाजवाद, अर्थशास्त्र आदी विषयांवर त्यांची ११ पुस्तके प्रसिद्ध झाली होती.
जावडेकर यांचे संपूर्ण जीवन हे “बोले तैसा चाले” या वृत्तीचा अविष्कार होते. नैतिक मूल्यांवर हुकमत, शुद्ध आचरण आणि स्फटिकवत चारित्र्य यामुळे जावडेकर यांचा त्यांच्या विरोधकांनाही दरारा वाटत असे.
जावडेकर गांधीवादी अहिंसेचे कट्टर पुरस्कर्ते होते. जावडेकर यांचे जीवन आणि विचार आजही आदर्शवत ठरावेत असे आहेत.
Leave a Reply