शरद पवार हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे राजकीय नेते. त्यांचा जन्म 12 डिसेंबर, 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला.
1956 साली त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली. त्यानंतर कॉंलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले. पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले. त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. वयाच्या 24व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकिय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.
18 जुलै 1978 रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबर कॉंग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले 12 आमदार, कॉंग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी `पुरोगामी लोकशाही दल` या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले. ते राज्याचे सर्वात तरूण मुख्यमंत्री होते. 1980 साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून 1980 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. कॉंग्रेस(इंदिरा) पक्षाने 288 पैकी 186 जागा जिंकल्या आणि बॅंरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.
1984 सालची लोकसभा निवडणुक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील 48 पैकी केवळ 5 जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता. मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले. मार्च 1985 ची राज्य विधानसभा निवडणुक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या कॉंग्रेस(स) पक्षाने 288 पैकी 54 जागा जिंकल्या आणि पवार राज्यविधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.
1987 साली 9 वर्षांच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे कॉंग्रेस(इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला. जून 1988 मध्ये पंतप्रधान आणि कॉंग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केंदिय मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला. त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली. 26 जून 1988 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱयादा शपथ घेतली. त्यापूर्वीच्या काळात राज्यात कॉंग्रेस पक्षाला फारसे आव्हान नव्हते. पण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती करून कॉंग्रेस पक्षाच्या अनेक वर्षे अबाधीत असलेल्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागला होता.त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी पवारांवर आली.
1991 च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी कॉंग्रेस पक्षाचा राज्यात एक हाती प्रचार केला.पक्षाने राज्यात 48 पैकी 38 जागा जिंकल्या आणि 1989 च्या निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही अंशी भरपाई केली.निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली.श्री.पी.व्ही.नरसिंह राव आणि अर्जुन सिंग यांच्याबरोबर पवारांचे नाव ही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे अशा बातम्या वर्तमानपत्रांत आल्या. मात्र कॉंग्रेस संसदीय पक्षाने श्री.पी.व्ही.नरसिंह राव यांना नेतेपदी निवडले आणि त्यांचा 21 जून 1991 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.
नरसिंह रावांनी पवारांना केंदिय मंत्रीमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले.26 जून 1991 रोजी त्यांचा केंदिय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याजागी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली.राज्य कॉंग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला.त्यानंतर नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले.त्यांनी 6 मार्च 1993 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सुत्रे हाती घेतली.
विधानसभा, चौथी खेळी
पवारांची मुख्यमंत्रीपदाची चौथी कारकिर्द अत्यंत वादग्रस्त ठरली. ते परत मुख्यमंत्री बनून एक आठवडा व्हायच्या आत, 12 मार्च 1993 रोजी मुंबईत भीषण बॉंबस्फोट झाले. त्यात 257 लोक ठार तर 600 हून अधिक लोक जखमी झाले. 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले.या संकंटांबरोबरच राज्यात कमालीच्या वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.गो.रा.खैरनार यांनी पवारांना दोषी धरून त्यांच्यावर अनेक आरोप केले. प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांनी वनखात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केले. तेव्हा पवारांचे सरकार भ्रष्टाचारी अधिकार्यांना पाठिशी घालत आहे असा आरोप झाला.जळगाव येथील सेक्स स्कॅंडल मध्ये अनेक तरूणींवर लैंगिक अत्याचार झाले.त्यात कॉंग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक सामील आहेत असा आरोप झाला. 23 नोव्हेंबर 1994 रोजी नागपूर येथे वंजारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकऱयामध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला. त्यात चेंगराचेंगरी होऊन 123 लोक मृत्यूमुखी पडले. त्यांच्या शिष्टमंडळाची आदिवासी कल्याण मंत्री श्री.मधुकरराव पिचड यांनी वेळेत भेट न घेतल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली असाही आरोप झाला.
1996 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पवार राज्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते होते.1996 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून विजय मिळवला आणि त्यानंतर ते राष्टीय राजकारणात उतरले.जून 1997 मध्ये त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतसीताराम केसरी यांच्याविरूध्द निवडणुक लढवली पण त्यांचा पराभव झाला.
त्यानंतर 10 जून 1999 रोजी शरद पवारांनी त्यांच्या `राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची` स्थापना केली. 1999 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.त्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.
2004 मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष केंदात मनमोहन सिंग यांच्या नेत्रुत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. 22 मे 2004 मध्ये शरद पवारांनी देशाचे क्रुषिमंत्री म्हणून सुत्रे हाती घेतली. तेव्हापासून ते त्या पदावर कार्यरत आहेत.
राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. 29 नोव्हेंबर 2005 रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले.
माती बरोबरच माणसांच्या मनांची मशागत करणारा नेता. राजकारणाच्या पुढे जाऊन कला, क्रीडा, शिक्षण, कृषी सहकार या क्षेत्रांची सखोल जाणीव. ३८ व्या वर्षी राज्याचा सर्वात तरुण मुख्यमंत्री. नंतर तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री.
## Sharad Pawar
Leave a Reply