शिरीष व्यंकटेश पै

Pai, Shirish

कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात मुक्तपणे संचार करणार्‍या लेखिका शिरीष पै. ‘गेल्या दहा हजार वर्षांत असं व्यक्तिमत्त्वं झालं नाही’ अशा व्यक्तिमत्त्वाच्या आचार्य अत्रे यांची शिरीष पै ही कन्या. दि. १५ नोव्हेंबर १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घरातच साहित्य विविध अंगानी मुक्तपणे संचार करीत होतं. हे बाळकडू त्यांना बालपणापासून मिळत होतं.

साहित्य विचाराचे संस्कार त्यांच्यावर आजूबाजूच्या वातावरणामुळे सतत होत असले तरी शिरीष पै यांची स्वतःची अशी एक शैली आहे. त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रसन्न शैलीतील ललित लेखिकेने वाचकांना आनंद दिला. तसेच त्यांनी लिहिलेल्या कवितांनी काव्यप्रकाराला न्याय दिला. ‘एक तारी’, ‘एका पावसाळ्यात’, ‘गायवाट’, ‘कस्तुरी’, ‘ऋतुचक्र’ इत्यादी त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.

मराठी कवितेत जपानी ‘हायकूं’ हा प्रकार रूजविण्याचा मान शिरीष पै यांच्याकडे जातो. ‘लालन बैरागीण’, ‘हे ही दिवस जातील’ ह्या कादंबर्‍या त्यांन लिहिल्या. छोट्या मुलांसाठी ‘आईची गाणी’, ‘बागेतल्या जमती’ या बाल साहित्याची निर्मिती केली तर ‘चैत्रपालवी’ ‘खडकचाफा’, ‘सुखस्वप्न’, ‘कांचनबहार’ हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शिवाय ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘झपाटलेली’, ‘कळी एकदा फुलली होती’ ही त्यांनी लिहिलेली नाटकं. ललित साहित्याची त्यांची पुस्तके गाजली. ‘आजचा दिवस’, ‘आतला आवाज’, ‘प्रियजन’, ‘अनुभवांती’, ‘सय’ ‘मी माझे मला’. आपल्या अफाट कर्तृत्वाच्या वडिलांचे चित्रण ‘पप्पा’ आणि ‘वडिलांचे सेवेशी…’ या दोन पुस्तकातून त्यांनी रंगवले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*