अॅथलेटिक्स या खेळातील ठाण्यातील एक अग्रगण्य नाव म्हणजे सौ. श्रद्धा मांद्रेकर.
व्हि.पी.एम. महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या श्रद्धाचं शालेय शिक्षण ठाण्यातील होली क्रॉस शाळेतून झालं. श्री प्रताप चव्हाण आणि त्यानंतर श्री. नाईक यांच्याकडून अॅथलेटिक्सचं प्रशिक्षण घेतलेल्या श्रद्धा मांद्रेकरांनी महाराष्ट्र राज्याच्या संघाचं १९८१ ते १९८६ अशी सलग पाच वर्षं कर्णधारपद भूषविलं. १९८२ साली झालेल्या पंचदेशीय आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतला होता.
हेप्टाथलान या प्रकारात त्यांचा राज्यस्तरावर विक्रम आहे. त्यांच्या कारकीर्दीत त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आलं आहे. यात, १९८६ साली मिळालेल्या अॅथलेटिक्स मधील शिव छत्रपती पुरस्काराचं नाव अग्रस्थानी आहे; कारण हा पुरस्कार मिळविणार्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला अॅथलिट आहेत.
सध्या त्या होली क्रॉस शाळेत अॅथलेटिक्सचं प्रशिक्षण देतात, तसेच गरजू विद्यार्थ्यांना त्या मोफत मार्गदर्शन करतात. त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत भाग घेतला होता त्यापैकी चार जणांनी यशस्वीरित्या पदके पटकावली.
संदर्भ : माझे ठाणे
Leave a Reply